
कोकण आणि भगवान शंकर यांचं अगदी खास नातं आहे. इतकं की कधीकधी एकाच गावात शंकराची २-३ अतिशय सुंदर मंदिरे आपल्याला पाहता येतात. नागावजवळ नागेश्वर, वंखनाथ आणि भीमेश्वर अशी तीन शिवमंदिरे आहेत. थोडं उत्तरेला अक्षीला गेलं तर तिथं सोमेश्वर आहे.

या सर्व मंदिरांमध्ये काही साम्य आहे आणि प्रत्येक मंदिराच्या काही खास बाबी सुद्धा आहेत. पाण्याचे कुंड, त्यापुढे दीपमाळ आणि कौलारू सभामंडप आणि पेशवेकालीन पद्धतीचं गर्भगृह पाहून हे कोकणात आपण नेहमी पाहतो तसंच एक मंदिर वाटतं. भीमेश्वर जीर्णोद्धार पार्वतीबाईंनी 1758ला केला आणि कोणी नारायण भट रिसबूड यांनी 1764 मध्ये पुष्करणी बांधली.. दीपमाळ रावसाहेब विठोबा लोंढेनी बांधली असं वर्णन आंगरेकालीन अष्टागर मध्ये आहे

पण या मंदिरात एक खास पुरातन ठेवा आहे ज्यामुळे भीमेश्वराचं महत्त्व विशेष आहे. या मंदिरात चौदाव्या शतकातील एक मराठी शिलालेख जतन करण्यात आलेला आहे.

हा शिलालेख आहे राजा हंबीररावाचा. ठाणे ते मुरुडची खाडी या भागात त्याची सत्ता होती. अर्थातच चौल आणि ठाण्यासारखी समृद्ध बंदरे आणि त्यांचा महसूल याच्या आधारावर हंबीररावाने समृद्ध राज्य उभे केले असावे. बिंबाख्यान या ग्रंथात हंबीरखानाचा उल्लेख येतो तो हाच हंबीरराव असावा असा कयास आहे. हिजरी ७६९ शक संवत १२८९ प्लवंगनाम संवत्सर रोजी ठाणे कोकणवर राज्य करणाऱ्या श्रीमत्यप्रौढिप्रतापचक्रवर्ती महाराजाधिराज श्रीहंबीरराव धर्मदान लिहीन देत आहे. अशी या शिलालेखाची सुरुवात आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पंकज समेळ यांच्या महाराष्ट्र देशा ब्लॉगला नक्की भेट द्या.
डॉ सूरज पंडित यांनी हंबीररावाच्या विविध शिलालेखातील त्याने धारण केलेल्या बिरुदांचा आधार घेत त्याच्या मुत्सद्दी वृत्तीबद्दल कयास मांडला आहे. त्याच्या रानवड येथील पहिल्या शिलालेखात तो पश्चिम समुद्राधिपतीराय कल्याण विजय राज्य असे यादव परंपरेतील बिरुद धारण करतो. त्यानंतर फिरोजशाह तुघलकाच्या आक्रमण काळात १३६५-६६ च्या सुमारास तो तत्पादपद्मोपजीवी महाराजाधिराज हे बिरुद धारण करतो आणि फिरोजशाह तुघलकाचा उल्लेख या शिलालेखात आहे. हंबीररावाने त्याचे मांडलिकत्व पत्करलेले दिसते. भीमेश्वर नागावचा शिलालेख १३६७-६८च्या आसपासचा आहे जेव्हा त्याने प्रौढप्रताप चक्रवर्ती बिरुद धारण केले आहे आणि तुघलकाचे मांडलिकत्व झुगारून दिलेले दिसते असे प्रतिपादन डॉ सूरज पंडित करतात. नागाव व्यतिरिक्त या हंबीररावांचे शिलालेख वाघरण, रानवड, नांदगाव आणि मुंबईत भाभा आण्विक संशोधन केंद्र या ठिकाणी सापडले आहेत.
कोकणातील किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, लेणी यांची गोष्ट आम्ही दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून सांगत आहोत. या चित्र भ्रमंतीत सहभागी होण्यासाठी ब्लॉगला भेट देत रहा.
संदर्भ –
1) कुलाबा जिल्हा गॅझेट
2) आंगरेकालीन अष्टागर – शां वि आवळस्कर
3) पंकज समेळ ब्लॉग
4) डॉ सूरज पंडित – लोकमत लेखमाला – वारसा मुंबईचा