
थळच्या बंदरातून शिवरायांच्या खांदेरी किल्ल्याकडे जात असताना डाव्या बाजूला एका छोट्या पण भक्कम जलदुर्गाचे दर्शन होते. हा आहे सिद्दीने बांधलेला आणि झुंजवलेला उंदेरी किल्ला. साधारणपणे सिद्दी म्हंटलं की डोळ्यासमोर येतो जंजिऱ्याचा बेलाग किल्ला. पण उंदेरीचे महत्त्वही कमी नाही. अशा चिवट आणि लढाऊ शत्रूवर वर्चस्व मिळवूनच मराठ्यांचे स्वराज्य स्थापन होऊ शकले.

या दुर्गाचे दर्शन खांदेरीला जोडूनच करता येते. परंतु मी जेव्हा खांदेरीला गेलो होतो, त्यावेळेला नुकतेच वादळी हवामान येऊन गेलेले असल्याने आणि समुद्र तितका शांत नसल्याने आमच्या बोटीचे नाखवा उंदेरीजवळ जायला उत्सुक नव्हते. उंदेरीला जेटी नाही आणि जवळपास उथळ पाण्यात खूप खडक आहेत. त्यामुळे तिथं काळजीपूर्वक जावे लागते असे त्यांनी सांगितले. किल्ल्याजवळ सुरक्षित अंतरावरून चित्रण करून आम्ही पुढे खांदेरीकडे निघालो. या पोस्टमध्ये उंदेरीच्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

इंग्रज इतिहासकार फ्रायरने (हा बहुतेक व्यवसायाने डॉक्टर असावा) १६७४ च्या सुमारास या बेटाचा उल्लेख Hunarey असा केला आहे. खांदेरी-उंदेरी बेटांना हेन्री- केनरी म्हणत असत. मुंबईवर इंग्लिशचे स्वामित्व होते या सबबीखाली या दोन्ही बेटांवर ते आपला हक्क सांगत असत. छत्रपती शिवरायांच्या आरमाराने केग्वीन सारख्या सेनापतीला न जुमानता इथं भर पावसाळ्यात खांदेरी दुर्ग उभा केला. त्याच वेळेला मराठ्यांच्या या प्रयत्नाला पायबंद घालण्यासाठी सिद्दीला पाचारण करण्यात आले. पण त्यानेही मराठ्यांना रोखण्यापेक्षा उंदेरीवर ताबा मिळवून स्वतःचे लष्करी उद्दिष्ट साध्य केले आणि इंग्लिशांची डोकेदुखी वाढवून ठेवली.

हा किल्ला थळ पासून सुमारे १.२ किमी अंतर पश्चिमेला समुद्रात एका बेटावर आहे. खांदेरी प्रकरणात मराठे आणि इंग्लिश झुंजत असताना सिद्दी कासिमने उंदेरी ताब्यात घेऊन तिथं तटबंदी बांधायला सुरुवात केली. मराठ्यांच्या आरमाराचा सेनापती दौलतखानाने उंदेरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात प्रचंड नुकसान होऊन त्याला पराभव स्वीकारावा लागला. दौलतखान स्वतः जबर जखमी झाला. खांदेरीची रसद मारणे मात्र सिद्दीला जमले नाही. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात उंदेरी जिंकण्यासाठी २०० माणसे किल्ल्यावर उतरवून मराठ्यांनी हल्ला केला. त्यातही मराठ्यांचा पराभव झाला. कान्होजींचे पुत्र सरखेल सेखोजी आंगरे यांनीही उंदेरी जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा सिद्दीने हा किल्ला इंग्लिशांना दिला. यावेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना लिहिलेल्या पत्रात थोरले बाजीराव अंजनवेल आणि उंदेरी ही सिद्दीचे दोन प्रबळ हात आहेत असा उल्लेख करतात. अंजनवेल प्रतिनिधीने जिंकावा आणि उंदेरी सेखोजी आंगरेंनी घ्यावा अशी योजना होती. हे पत्र १७३३ सालचे आहे. १७३६ मध्ये चिमाजी अप्पा आणि मानाजी यांची कामार्ले येथे सिद्दी सातशी चकमक होऊन त्यात उंदेरीचा सुभेदार सिद्दी याकूब ठार झाला. इथून पुढे आंग्रे-सिद्दी संघर्ष वाढत गेला. १७५८ मध्ये तुकोजी आंगरेनी रेवदंड्याच्या आरमारी तुकडीसह उंदेरीवर मोर्चे लावले. यात रामाजी महादेव आणि महादजी रघुनाथ यांची कुमक होती. त्यानंतर मानाजी आंग्रे यांचे निधन झाले व सिद्दीने कुलाब्यावर हल्ला केला. यावेळी रघोजी आंगरे उंदेरीवर चालून गेले. स्वतः नानासाहेब पेशवा त्यांच्या मदतीला गेला. २० जानेवारी १७६० रोजी पेशवा आरमारी सुभेदार नारो त्रिम्बक याने उंदेरी सर केला व त्यावर भगवे निशाण फडकवले. त्यानंतर १८१८ पर्यंत किल्ला मराठ्यांकडे होता. मधल्या काळातील काही नोंदी १८८३च्या कुलाबा जिल्हा गॅझेटमध्ये सापडतात व आंगरेकालीन अष्टागर या शां वि आवळस्कर यांच्या पुस्तकातही काही माहिती मिळते. गोपाळ आणि संभाजी आंगरे बंधूंनी या परिसरात चोऱ्यामाऱ्या सुरु केल्यानंतर त्यांपैकी दोषींना उंदेरी येथे कैदेत टाकण्यात आले होते ही घटना १७६९-७० ची आहे. १७७१-७२ मध्ये इथले अधिकारी बाबाजी आबाजी यांनी उंदेरी महालाची पुन्हा मोजणी करण्याची पेशव्याला विनंती केली आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले गेले. १७९१ मध्ये इथल्या मामलेदाराने आणि त्याच्या मंडळींनी सहा हजार दोनशे बासष्ट रुपयांची अफ़रातर केल्याने त्यांना काढून टाकण्यात आले आणि लक्ष्मण कृष्ण चादरकर यांची नेमणूक करण्यात आली. पुढे १८०३ मध्ये अप्पाजी बहिरट उंदेरीचा हवालदार नेमला गेला.
उंदेरी किल्ल्याच्या बाबतीत हल्लीची एक घटना आहे. या घटनेला संतापजनक म्हणायचं, हास्यास्पद म्हणायचं की करुण म्हणायचं तुम्हीच ठरवा. २००६ साली थळ मधील काही ग्रामस्थांनी वहिवाटीच्या हक्काचा वापर करून मालकी हक्क असल्याप्रमाणे किल्ला रमेश कुंदनमल नामक एका उद्योजकाला चक्क विकला आणि २ कोटी रुपयांचा हा व्यवहार १२ लाख स्टॅम्प ड्युटी घेऊन उप-निबंधकाने नोंदणीकृतही केला. ही नोंदणी झाली तो दिवस बहुतेक सुट्टीचा दिवस होता! लोकांनी खूप गहजब केल्यानंतर शासनाने हा व्यवहार रद्द केला. आज हा किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि संग्रहालये निदेशनालयाकडे आहे.
आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून कोकण किनाऱ्यावरील किल्ले, मंदिरे, लेणी अशा अनेक ठिकाणांची चित्रभ्रमंती करत आहोत. आमच्या ब्लॉगला भेट देत रहा. लाईक करा. शेयर करा. आणि तुमच्या कोकणवेड्या किंवा पर्यटनवेड्या मित्र मैत्रिणींना, आप्तेष्टांनाही आवर्जून सांगा ही अगत्याची विनंती.