Darya Firasti

भ्रमंती किल्ले देवगडची

देवगड भ्रमंतीमध्ये मला श्री चारू सोमण यांची खूपच महत्त्वाची साथ मिळाली. श्री अशोक तावडे यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. देवगडचे डॉक्टर मनोज होगले हे दर्या फिरस्तीच्या निधी संकलनात प्रायोजक झाले त्यांचे आभार.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एका भूशिरावर बांधलेला हा किल्ला .. किल्ले देवगड. हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेला किल्ले देवगड म्हणजे कोकणातील भटक्यांसाठी निसर्गसौंदर्य अनुभवण्याची उत्तम जागा. पूर्व पश्चिम पसरलेली तटबंदी, त्याभोवती असलेला २०-२५ फूट खोल खंदक, दीपगृह आणि पश्चिमेला दूरपर्यंत दिसणारा अथांग निळा समुद्र हा देवगडचा डौल आहे.

हा किल्ला नेमका कोणी बांधला याबद्दल इतिहासकार पक्के भाष्य करू शकत नाहीत कारण तसे काही दस्तऐवज उपलब्ध नाहीत. दरवाजाची गोमुखी बांधणी पाहता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असा कयास काही इतिहासकार मांडतात. परंतु अशीच बांधणी सरखेल कान्होजी आंग्रेनी बांधलेल्या पूर्णगडसारख्या किल्ल्यांतही दिसते.

विजयदुर्ग जिंकण्यासाठी ऍडमिरल ब्राऊनने मोहीम काढली त्याला काही यश मिळाले नाही. उलट त्याचा मोठा पराभवच झाला. त्यावेळेला काहीतरी साध्य झाले हे सिद्ध करण्यासाठी ब्राऊनने सावंतवाडीकर भोसले यांच्याशी तह करून देवगड जिंकण्याची योजना आखली. पण ही युती काही ठोस करू शकली नाही आणि इथंही इंग्लिश नौदलाचा पराभव झाला. फ्राम नावाचे बॉम्बफेक करणारे जहाज विजयदुर्ग प्रमाणेच इथंही अपयशी ठरले. पुढे ७ एप्रिल १८१८ मध्ये कर्नल इमलाक ने किल्ला जिंकून ब्रिटिशांची सत्ता इथं स्थापित केली.

देवगड समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला पवनचक्की असलेलं पठार आहे तर दुसऱ्या बाजूला उत्तर पठारावर देवगड किल्ला जवळजवळ १०० एकर परिसरात पसरलेला आहे. इथं गाडीरस्त्याने थेट किल्ल्याच्या दारापर्यंत पोहोचता येते. परंतु किल्ला नीट पाहायचा असेल तर देवगड बंदरापाशी जाऊन किल्ला चढत वर जायचे. बंदराजवळ दिर्बादेवी मंदिर भागात किल्ल्याचा दरवाजा आणि तटबंदी दिसते.

किल्ल्याच्या आत हनुमानाचे स्थान आहे तिथं आजही पूजा केली जाते. परंतु श्री गणेशाच्या मंदिराचे तिथं सुरु असलेले जीर्णोद्धाराचे काम पाहता त्यात कोकणी पारंपरिक स्थापत्याच्या जागी काँक्रीटचे मंदिर बांधले जाते आहे असं खेदाने नमूद करावे लागते.

बंदराकडून वर चढत असताना नागमोडी बुरुज आणि दरवाजा पाहायला मिळतात. ते पाहून अगदी साध्या पायवाटेने वस्तीतूनच माथा गाठता येतो.

किल्ल्याच्या आत एकच बांधकामाचा अवशेष दिसतो. ते म्हणजे कोठारसदृश दगडी बांधकाम. तिथं नेमके काय होते हे दस्तऐवज उपलब्ध नसल्याने सांगता येणे कठीण आहे.

देवगड नदी किल्ल्याच्या भूशिराशी अरबी समुद्राला येऊन मिळते. या नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सामरिक वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी देवगड किल्ल्याचा चौकी म्हणून उपयोग होत असावा. इथं दिवसभर बसून सागराची विविध रूपे पाहण्यात दिवस कसा निघून जातो ते समजतही नाही.

देवगडचे दीपगृह अतिशय महत्वाचे आहे. परंतु मी इथं सकाळी गेलो त्यामुळे मला दीपगृह पाहता आले नाही. संध्याकाळी साडेतीन ते पाच या वेळेत हे दीपगृह पाहता येते. खाडीचा परिसरही इथून न्याहाळता येतो.

या दर्याफिरस्तीच्या प्रवासात माझ्या टाटा नॅनो गाडीने मला नेहमीच साथ दिली आहे. डोंगर, घाट, अरुंद गल्ल्या, महामार्ग, सड्यावरील कातळ रस्ते. सगळीकडे मला ही गाडी विनातक्रार घेऊन गेली.

या किल्ल्यात फारसे पुरातन अवशेष जरी शिल्लक नसले तरी इथली रेखीव तटबंदी आणि खंदक पाहायला छान वाटते.

दर्या फिरस्ती करत असताना रेवसपासून तेरेखोलपर्यंत मी जवळजवळ सव्वाशे समुद्रकिनारे पाहिले आहेत. या सगळ्यांबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात. असं वाटतं की आपल्या शब्दांतून कोकणातील निसर्गसौंदर्याची विविधता मांडणे अशक्य आहे. माझं प्रवासवर्णन फक्त साक्ष आहे माझ्या अनुभवाची. आणि तुम्हाला हाक आहे ही अपरान्तभूमी अनुभवण्यासाठी येण्याची

2 comments

  1. Vijay Sawant

    मी या परिसरांत तीन वेळां जाऊन तिथं सोमणांच्या लाॅज मध्ये राह्यलोय. विजयदुर्ग पाहिला असल्याने किल्ले देवगड पहाण्यांत मला फारसं स्वारस्य नव्हतं.या ऐतिहासिक वास्तु्विषयक लिखाणाचा अभाव आहे हे मला पटतं. शिवाय असलंच तरी त्या लिखाणाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न असतोच. सध्या शेजवलकरांचं “पानिपत १७६१” वाचतोय, त्यांत सुध्दा शेजवलकर या बखरीं बद्दल किती साशंक होते ते लिहिलंय. आपण वाचतो तसाच इतिहास घडला होता कां ?

    देवगडच्या पठारावर मी पहिल्यांदा पवनचक्क्या पाहिल्या तेव्हा खुप बरं वाटलं होतं. अनिश्चित इतिहासांत अडकुन रहाण्यापेक्षा वर्तमानकाळांत राहुन भविष्यकाळाच्या या चिन्हांकडे (Renewable Energy) बघणं मला जास्त योग्य वाटतं.

    कोकणात इस्लाम पसरला तो समुद्रमार्गे. दापोली दाभोळ व विजयदुर्ग च्या किल्ल्याबाह्रेर मला तो दिसला. इतिहासाच्या या सामाजिक अंगाचं संशोधन करायला हवं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: