
आंबोळगडच्या सुंदर समुद्रकिनाऱ्याजवळच यशवंतगड किल्ल्यापाशी आहे नाटे नावाचं एक टुमदार छोटंसं गाव. या गावाचं वैभव म्हणजे इथं असलेलं नाटेश्वर शिवमंदिर. मुख्य रस्त्यापासून थोडं आत जाऊन स्वयंभू जागृत देवस्थान नाटेश्वर मंदिर आपल्याला सापडतं. मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे दारातच असलेल्या दीपमाळांची दिमाखदार रचना.

विशेष म्हणजे हे मंदिर जरी भगवान शंकराचे असले तरीही इथं राम-लक्ष्मण-सीता यांच्या सुबक मूर्तीही पाहता येतात. आणि त्यांच्या चरणी लीन झालेले श्री हनुमान सुद्धा.

राजापूर तालुक्यात धोपेश्वर (म्हणजेच धूतपापेश्वर) सारखी अनेक सुंदर मंदिरे आहेत. कोकणी घरे, वाड्या, नारळ-सुपारीच्या बागा यांच्या आसमंतात इथल्या मंदिरांमध्ये खरोखरच दैवी अनुभव मिळावा अशी शांतता आणि मांगल्य असते. नाटेश्वर मंदिरही तसेच स्वच्छ, सुंदर आणि अगदी साधे, कोकणी बाज असलेले. येणाऱ्या भक्तांना आशीर्वादांबरोबरच मनःशांती सुद्धा देणारे.

कोकणातील भ्रमंती ही निसर्गाचा आदर करून करायला हवी. अशाच दृष्टीने इथं गणेश ऍग्रो टुरिझम प्रकल्प श्री गणेश रानडे यांनी निर्माण केला आहे. अगदी जवळ दोनदा जाऊनही तिथं राहण्याचा माझा योग आलेला नाही. तुम्ही मात्र इथला अनुभव घ्या आणि तुमचा अभिप्राय नक्की दर्या फिरस्तीला कळवा. कोकणातील भटकंतीचा अनुभव घ्यायला पर्यावरण पूरक पर्यटन केंद्रांची निर्मिती व्हायला हवी. आंबोळगड जवळच नाटे येथे असलेलं गणेश रानडे यांचं गणेश ऍग्रो टुरिझम यासाठी एक उत्तम उदाहरण मानता येईल. आंबोळगड ला निवांत सुट्टीसाठी जाणार असाल तर इथंच राहण्याचा अनुभव घ्या! ही शिफारस कोणत्याही प्रायोजनाबद्दल किंवा देणगी घेऊन करत नसून इथलं नियोजन आणि दृष्टी मला आवडली म्हणून करतोय. +919226340546 आणि +919422433676 या क्रमांकांवर श्री गणेश रानडे यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. इथं जवळच नाटे गावचा यशवंतगड किल्ला, पडवणे आणि गोडीवणे समुद्रकिनारे, आंबोळगड, मुसाकाजी बंदर अशी ठिकाणे पाहता येतील.