
साखरप्याजवळ सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर सुमारे 900 मीटर उंचीवर प्रचितगडाच्या परिसरात रत्नागिरी जिल्ह्यातील या महत्त्वाच्या नदीचा उगम होतो. संगमेश्वर ते सैतवडे असा 80 किमी प्रवास करून शास्त्री नदी सिंधुसागरात विलीन होते. त्यापैकी पहिले 16 किलोमीटरचा प्रवास संगमेश्वर तालुक्यातील डोंगराळ भागात होतो. तिथं गर्द हिरव्या रानातून अनेक छोटेमोठे प्रवाह नदीत येऊन मिळतात. गडगडी, बाव(67km), आसवी, गड(47), कापशी(48km) आणि गंडगी या शास्त्री नदीच्या उपनद्या आहेत.

शास्त्री नदीला जयगड नदी असेही म्हणतात कारण तिचे मुख जयगड किल्ल्याजवळ आहे. नदीचे पाणलोट क्षेत्र 2173 वर्ग किलोमीटर असून सरासरी जलसंपदा 6261 दशलक्ष घन मीटर आहे असं सरिताकोश सांगतो. आरवली हे गाव मुंबई-गोवा महामार्गावर असून इथले शिवमंदिर आणि गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत. इथं जवळच शास्त्री नदीच्या तीरावर उतरून स्वच्छ शीतल पाणी, काठावरील वनराई आणि दगड-जुन्यात १९३७ साली बांधण्यात आलेला ब्रिटिश कालीन पूल आवर्जून पाहण्यासारखा आहे.

जयगड बंदर हे विजापूर काळापासून महत्वाचे मानले गेले आहे. आणि संगमेश्वरही ऐतिहासिक व्यापारी बंदर होते. आता मात्र गाळ आणि खडकाळ पात्र यामुळे पूर्वेकडे शास्त्री नदी जलवाहतूक करण्यासाठी तितकीशी उपयुक्त राहिलेली नाही. संगमेश्वर पलीकडे पश्चिमेला नदीच्या मुखापर्यंत मात्र नदीचे पात्र रुंद होत जाते. संगमेश्वर कडून रत्नागिरीच्या दिशेने जाताना उक्षीच्या अलीकडे निढळेवाडी नावाचे गाव आहे.

तिथं संगमेश्वरी नौका बांधणीचा व्यवसाय चालतो. छत्रपती शिवरायांनी गुहागरजवळील सुतार समाजाला खास जहागीर देऊन इथं आणले आणि मराठा आरमाराच्या उभारणीचे काम त्यांच्या हाती सोपवले. आता फायबरच्या बोटी लोकप्रिय झाल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे.

बाव नदी, गड नदी (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी गड नदी वेगळी) आणि शास्त्री नदी करजुवे गावापाशी एकत्र येतात. हा संगम परिसर फार निसर्गरम्य आहे.

गुहागरकडून गणपतीपुळेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना राई-भातगाव पुलामार्गे जाता येते. इथं लोकवस्ती कमी असून डोंगराळ आणि जंगल प्रदेश आहे.

जयगड बंदर छोट्या जहाजांसाठी उपयुक्त आहे. आता मात्र तिथं चौगुले आणि जिंदल या दोन कंपनी मोठी बंदर बांधणी करत आहेत. नदीच्या मुखाशी उत्तरेला तवसाळची पुळण आहे तर दक्षिणेला जयगड-कऱ्हाटेश्वर परिसर आहे.

जयगड किल्ल्याचा उपयोग शास्त्री नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सामरिक वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे हा होता. तवसाळजवळ विजयगड नावाच्या किल्ल्याचे अवशेष आजही पाहता येतात. जयगड किल्ल्याबद्दल अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. इथं पुढं नांदिवडे येथे डोंगरावर शंकराचे मोठे स्थान आहे. ते म्हणजे जोग मंडळींचे कुलदैवत असलेले श्री कऱ्हाटेश्वर देवस्थान – त्याबद्दल इथं अधिक वाचता येईल.

जयगड किल्ल्याचा पडकोट नदीच्या मुखाजवळ असून त्याचे बुरुज बंदर, जेट्टी, तवसाळ परिसरातून दिसतात.

तवसाळ आणि जयगड यांच्या दरम्यान सुवर्णदुर्ग शिपिंग मार्फत बोटसेवा चालते. त्याद्वारे दोन चाकी आणि चारचाकी गाड्या नदी पार करू शकतात. जेट्टीवर थोडं आधी पोहोचायचं, वाहन पार्क करून तिकीट काढायचं आणि एखादा कप चहा गरमागरम वडापाव बरोबर घ्यायचा. बोट आली की बोटीत वाहन नीट पार्क करून वरच्या डेकवर जायचे आणि नदीच्या परिसराचा देखावा डोळ्यात भरून घ्यायचा.

या बोटसेवेबद्दल अधिक माहिती तुम्हाला www.carferry.in या पोर्टलवर मिळेल. जर गुहागर ते रत्नागिरी या परिसरात भ्रमंती करायची असेल तर एकदा या बोटीचा अनुभव नक्की घ्यायला हवा आणि एकदा राई-भातगाव पुलाच्या परिसरातून भटकावे. दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही कोकणातील अनेक अनवट ठिकाणांचं डॉक्युमेंटेशन करत आहोत. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर शेयर करायला विसरू नका ही विनंती. येवा कोकण आपलाच असा.