केशवराज म्हंटलं की डोळ्यासमोर येते दापोलीजवळ आसूद जवळ डोंगरावर वसलेले रम्य देऊळ.. एकेकाळी आडवाटेवरील पर्यटनस्थळ असलेले हे मंदिर आता आवर्जून पाहण्याच्या ठिकाणांमध्ये गणले जाते. पण आज मी तुम्हाला दुसऱ्या एका केशवराजाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे. दापोली पासून हे ठिकाण फार दूर नाही.. वेळवी केळशी रस्त्याने दौली गावाच्या अलीकडं डाव्या बाजूला एक रस्ता दरीत उतरतो तिथं अडीच किलोमीटर आतमध्ये हे विलक्षण ठिकाण आहे. सडवे, शेडवई, बिवली, शीर, धामणी, कोळिसरे, दिवेआगर अशा अनेक ठिकाणी शिलाहारकालीन विष्णू शिल्पे आहेत.. सुमारे ९०० ते १००० वर्षे जुनी ही शिल्पे कोकणातील पुरातत्व रत्ने आहेत असे म्हंटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.. तुरवडे येथील केशवाची मूर्ती त्याच श्रेणीची आणि अतिशय सुंदर कोरीवकाम असलेली आहे. पण केवळ इथलं शिल्पवैभव हे एकमेव आकर्षण नाही. निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि काळाच्या चक्रावर न धावता काहीसं निवांतपणे मागे रेंगाळलेले हे ठिकाण पर्यटक म्हणून पाहण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे असं मी कोकणातला भटक्या म्हणून अगदी खात्रीने सांगू शकतो

वेळवी ते केळशी हा रस्ता तसा छानच असतो.. अरुंद पण बहुतांश ठिकाणी व्यवस्थित डांबरीकरण असलेला पण काहीसा अरुंद.. समोरून एसटी फेरारीच्या वेगात आली की कशीबशी गाडी घाईघाईने बाजूला घ्यावी लागते इथं.. उत्तरेकडे या रस्त्याने मंडणगड-आंबेत-माणगाव असं मुंबईच्या दिशेने जाता येते.. भोमडी नंतर दौली गाव येते.. दौली गावाची कमान येण्यापूर्वी काही मीटर आधी डावीकडे जाणारा रस्ता आपल्याला तुरवडे गावात घेऊन जातो. रस्ता वरच्या बाजूला तसा रुंद आणि सपाट असला तरी अनेक ठिकाणी तो अरुंद आणि तीव्र उताराचा आणि नागमोडी वळणांचा आहे. खाली अनेकांच्या आंब्याच्या बागा आहेत त्यामुळे बोलेरो सारख्या गाड्या अगदी खालपर्यंत जातात.. मला मात्र हा धोका पत्करायचा नसल्याने मी केळशीचे स्नेही श्री संतोष महाजन यांची होंडा शाईन घेऊन गेलो.

सुमारे दीड किलोमीटर अंतर मी बाईकने उतरले असेल त्यानंतर अरुंद, घसाऱ्याची आणि अतिशय तीव्र उतार असलेली वळणे येऊ लागली.. एकदोन ठिकाणी ब्रेक दाबल्यानंतर दुचाकी घसरली.. तेव्हा मी ती कडेला लावून पुढे पायी जायचे ठरवले.. १०० मीटर चाललो असेन तेव्हा डावीकडच्या पायवाटेने एक ताई आपल्या गाईंना घेऊन आल्या आणि तुरवडेच्या दिशेने चालत होत्या.. मला त्यांनी कुणीकडे चालला असं विचारलं.. केशवराज मंदिर म्हंटले तेव्हा हसून म्हणाल्या गाडी जाते की .. सगळे घेऊन जातात.. घाबरता कशाला! मी म्हंटलं आता अर्धा डोंगर उतरलो आहे तर चालतच पुढं जातो.

सकाळचे साडेसात वाजले असतील त्यामुळे २५-२६ डिग्री तापमान होते.. दरीत कदाचित २-३ डिग्री सेल्शियस कमीच असतील.. सुमारे १२० मीटर उतरून आपण खाली जातो.. म्हणजे साधारणपणे ४०० फूट म्हणता येईल. दोन्हीकडे गर्द वनराई आणि पक्ष्यांचा किलबिलाट.. कुठंतरी दूरवर गावात लागलेला रेडियो .. ओल्या मातीचा गंध, ऊन सावलीचा खेळ आणि चालता चालता हातांना होणारा पानांचा स्पर्श.. असा सगळ्याच इंद्रियांना मुग्ध करून टाकणारा आसमंत अनुभवत दरीत उतरायचं.. नदीचे पात्र अरण्यात लपलेले असल्याने दिसत नाही मात्र खाली पोहोचत आलो की खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकू यायला लागतो

डाव्या बाजूला आता झाडांच्या जाळीमागे नदीचे पात्र दिसायला लागले होते. जांभा दगडाच्या पायऱ्या आल्या तेव्हा वाट सोडून खाली उतरलो एक जुने कौलारू घर आणि समोर उभी केलेली बैलगाडी हीच काय ती तिथल्या मानवी अस्तित्वाची खूण.. नदीपलीकडे मंदिराचा कळस तर दिसत होता पण पायवाट काही दिसेना.. कुठूनतरी अचानक तिथं एक आजोबा अवतीर्ण झाले.. मंदिराचे गुरव असावेत.. मला म्हणाले यावेळी पावसाळा लांबला त्यामुळे नदीत दगड टाकून वाट बनवलेली नाही.. ही काठी घे आणि हळूहळू चालत पलीकडे जा.. पाणी गुडघाभरही नाही पण शेवाळ्यावरून घसरणार नाहीस तेवढं पहा.

सकाळचे साडेआठ वाजायला आले असावेत पण तरीही इथं दरीत ऊन अजूनही जेमतेम पोहोचले होते… निवळशंख पाणी आणि त्यात सुळकन फिरणाऱ्या छोट्या माशांच्या टोळ्या.. पाण्याची बाटली रिकामी झाली होती ती पटकन पाण्यात बुडवून भरली आणि गोड आणि गर मिनरल वॉटर ने तृप्त झालो.. इथं खाली किलबिलाट करणारे पक्षीही नव्हते.. रातकिड्यांची किरकिर सुरु होती आणि कुठल्यातरी झाडावर बसलेल्या घुबडाची धीरगंभीर साद ऐकू येत होती.. झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या काळतोंड्या लंगूर माकडाने माझ्याकडं पाहिले आणि एक हाळी देऊन ते रानात गडप झाले.. जेमतेम ५०-६० मीटर रुंद असलेले नदीपात्र ओलांडून मी दुसऱ्या तीरावर आलो तिथं पात्राला उतार होता आणि खळाळत पाणी वाहत होते.. एक छोटेसे सुबक दगडी मंदिर दृष्टीस पडले.

जसा कोकणातला माणूस साधा तशीच त्याची घरेही साधी.. आणि इथल्या देवाचेही फार काही वेगळे नाही.. जागृत देवस्थानाच्या कोलाहलात.. नवस मागायला फेडायला आलेल्या भक्तांच्या गोंगाटात आणि भाऊगर्दीत देव रमत असेल असं मला वाटत नाही.. किंवा तिथं त्याचं कर्तव्य पार पाडून इथं शांत निष्काम भक्ती अनुभवायला येत असेल.. खरं म्हणजे मी अज्ञेयवादी आहे.. देव आहे अशी काही माझी श्रद्धा नाही.. तो नाहीए हे मी सिद्धही केलेलं नाही.. पण अशा ठिकाणी निसर्गाच्या कृपेने पवित्र मांगल्यपूर्ण शुद्ध ठिकाणी भारलेलं वातावरण असतं हे मात्र नक्की.. आपल्या रोजच्या जीवनात जे शुद्ध अनुभव आपल्याला मिळत नाहीत ते शुद्ध आणि अंतर्मुख करणारे अनुभव कोकणातल्या देवळांमध्ये सहज आपल्याला प्रसाद म्हणून गवसतात असं मला वाटतं

नित्सुरे, खांबेटे, वर्तक अशा शांडिल्य गोत्री कुटुंबांचे हे कुलदैवत. असं म्हणतात की तुरवडे गावात ५ घरे आणि २५ लोकसंख्या आणि त्यात नदीच्या दोन्ही बाजूला करमरकर मंडळी राहतात आणि या देवळाची काळजी घेतात.. गोकुळाष्टमीला इथं उत्सव असतो.. मंदिराच्या जुन्या फोटोत कौलारू सभामंडप दिसतो. मी गेलो तेव्हा मात्र ते सगळं बांधकाम ढासळून गेलेलं दिसलं.. पण आतली केशवाची विलक्षण कलाकुसर असलेली एक मीटर उंच मूर्ती हे या ठिकाणचं खास वैभव. पद्म-शंख-चक्र-गदा अशा क्रमात मूर्तीच्या हातातील आयुधे असल्याने ही मूर्ती केशव रूप मानली जाते.

शिस्त नावाच्या दगडात कोरलेली ही मूर्ती असावी असं जाणकार सांगतात.. मागच्या प्रभावळीवर ब्रह्मा-विष्णू-महेश आहेत.. शिवही आहे.. शंख आणि चक्र हे फॉर्म अप्रतिम कोरले आहेत.. आभूषणे तर अगदी खरी वाटावीत इतकी नाजूक आणि सुबक आहेत.. ११ व्या किंवा १२ व्या शतकातील या शिल्पकारांच्या प्रतिभेला दंडवत घालावासा वाटेल इतकं अद्वितीय हे कोरीव काम पण थोडंसं आडवाटेला असल्याने दुर्लक्षित. मूर्तीच्या पायाशी गरुड आणि लक्ष्मीही कोरलेले आहेत. दशावतार सुद्धा आहेत.. एक मूर्ती हलधारी वाटते त्यामुळं तो बलराम असावा असा माझा कयास आहे.

परत निघालो तेव्हा केशरी नदीच्या पाण्यात चपला काढून पाय बुडवून बसण्याचा मोह आवरला नाही.. तिथलं अद्भुत रम्य जग सोडून परत जायला पाय निघत नव्हते.. एका बाजूला गर्द रान तर दुसऱ्या बाजूला आंबा, केळी, सुपारी अशी बाग.. डोंगराच्या ओंजळीत असलेल्या या दरीत झिरपलेला मोबाईल फोनचा सिग्नल हीच काय ती २०२२ मध्ये आपण असल्याची खूण.

केळशीत परतायचं होतं म्हणून निघालो आणि दुचाकीच्या दिशेने चालू लागलो.. आता कुठं सूर्याची किरणे वनराईच्या चाळणीतून इथवर पोहोचायला लागली होती.. रानातल्या थंडाव्यावर ऊबदार फुंकर घालणारी ही किरणं गर्द हिरव्या जंगलाला सोनेरी काठाने सजवीत होती. इथं पुन्हा कधीतरी नक्की येईन असा निश्चय करत मी परतीच्या वाटेला लागलो होतो. केळशीतील वैभव वर्तक आणि संतोष महाजन यांच्या मदतीने हा प्रवास पार पडला. दर्या फिरस्तीची ही भ्रमंती करत असताना अशी नवनवीन ठिकाणे गवसत राहतात.. कोकणातील या अनुभवांच्या गोष्टी वाचण्यासाठी या ब्लॉगला भेट देत राहा.. आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा