
अगदी अनपेक्षितपणे, अनपेक्षित ठिकाणी एखादा कायमचा लक्षात राहील असा अनुभव मिळणं ही भ्रमंतीची मजा आहे. असंच एक अनपेक्षितपणे मला गवसलेलं कोकणातील रम्य ठिकाण म्हणजे रोहिले. जयगडहून गुहागरकडे जाताना तवसाळला फेरीने शास्त्री नदी ओलांडली की सागरी महामार्गाने वेळणेश्वर, हेदवी, पालशेत, असगोळी असे टप्पे पार करत आपण जातो. तवसाळच्या किनाऱ्यानंतर एक छोटीशी नदी येते ती ओलांडली की तांबूस वाळू असलेला छोटासा रोहिले किनारा लागतो. इथं नोव्हेंबरधील एका निवांत सकाळी मी अर्धा तास जो निसर्गानुभव घेतला तो अगदी अविस्मरणीय आहे. तवसाळ गावचा चढ ओलांडून पठारावर पोहोचलं की पश्चिमेकडे समुद्र आणि त्याला जाऊन भिडलेली छोटीशी खाडी दिसते. आंब्याची झाडे आणि नारळ पोफळीच्या गर्दीतून आपल्याला ही रोहिले किनाऱ्याची पहिली झलक दिसते. कोकणात प्रवास करत असताना जाणवणारी विशेष गोष्ट म्हणजे दोन अगदी बाजूबाजूला असलेल्या गावांच्या दरम्यान एखादी टेकडी किंवा खाडी असते आणि नकाशात जरी ही गावे शेजारी दिसली तरी २-३ किमी अंतराचा छोटासा नागमोडी घाट चढून आपण पलीकडे पोहोचतो. तवसाळचा डोंगर उतरून आपण रोहिले गावात शिरण्यापूर्वी एक छोटीशी नदी समुद्राला जाऊन मिळताना दिसते. त्या पुलाजवळ गाडी उभी करून स्वच्छ पाणी आणि गर्द हिरवळीचा हा आसमंत आवर्जून अनुभवावा असा वाटतो.

नकाशात बरीच शोधाशोध करूनही या छोट्याशा नदीचे नाव सापडले नाही. पण इथून पुढे हे अरुंद पात्र किमान ४-५ किलोमीटर तरी आत पूर्वेकडे जात असेल. वाहनांची आणि माणसांची अजिबात गर्दी नसल्याने या रानातील एकेक आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. खळाळणाऱ्या पाण्याने एक ठेका धरला होता तर नुकत्याच सुरु झालेल्या भरतीच्या लाटांची गाजसुद्धा ऐकू येत होती. इथून पुढे नदीकाठी महामाई देवीचे मंदिर आहे. आणि पूल ओलांडला की रोहिले गावाला सुरुवात होते.

तांबूस वाळूची पुळण आता आपल्याला डावीकडे खुणावते. रोहिले गावच्या किनाऱ्यावर आपण पोहोचतो. साधारणपणे सुंदर समुद्रकिनारा म्हणजे पांढरी शुभ्र वाळू असे समीकरण आपल्या डोक्यात असते आणि ते चूक आहे असं नाही. पण किनाऱ्यावरील वाळूचा रंग त्या वाळूत कोणती खनिजे आहेत यावर अवलंबून असतो. वेळास आणि गावखडी सारख्या ठिकाणी काळसर वाळूचा किनारा आहे. किनारा जर स्वच्छ ठेवला तर त्याचं सौंदर्य जपलं जातं. नाहीतर माडबन सारखा सुंदर किनारसुद्धा प्लॅस्टिकच्या कचऱ्याने विद्रुप होऊ शकतो. रोहिलेचा किनारा तांबड्या रंगाचा आहे आणि खडकाळ आहे. समुद्राच्या लाटा इथं वेगळ्याच संगीताचा ताल धरतात. शास्त्री नदीच्या मुखापासून हा किनारा जवळच असल्याने पाण्याच्या गतीला एक संथता, शांतता आहे. किनाऱ्याला लागून नेहमी दिसतात तशी नारळ सुपारीच्या बागा इथं नसून खुरट्या झुडपांची हिरवळ दिसते. पानझडीचा ऋतू आलेला असला तरीही इथं हिरव्या रंगाची उधळण सुरूच असते. शास्त्री नदीच्या पलीकडे जयगड बंदरात चाललेली लगबग सोडली तर असं वाटतं की इथं आल्यावर घड्याळाचा काटा पुढेच सरकत नसावा.

रोहिले हे गाव कदाचित महाराष्ट्रातील सगळ्यात छोट्या गावांपैकी एक असावे. क्षेत्रफळ फक्त ४ हेक्टर. गावात फक्त ८ घरे असून लोकसंख्या आहे फक्त २५ आणि २०११ च्या जनगणनेनुसार मतदारांची संख्या फक्त आहे १०. तवसाळला विजयगड किल्ल्याचे अवशेष आपण पाहू शकतो त्याच्या ब्लॉगसाठी इथं क्लिक करा.
इथून पुढे नरवण, हेदवी, वेळणेश्वर पाहत आपण गुहागरच्या दिशेने जाऊ शकतो. कोकणातील अशाच ठिकाणांची चित्रकथा वाचण्यासाठी दर्या फिरस्ती साईटला भेट देत रहा हे अगत्याचे आमंत्रण.
एक वेगळे ठिकाण
Reblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही and commented:
पर्यटकांसाठी कोकण हा एक अद्दभूत असा खजिना आहे. यातून असंख्य जगाच्या नजरेआड राहिलेल्या जागा सापडतात. त्यातीलच एक ठिकाण येथे दिलेले आहे. अवश्य भेट द्या.
Pingback: जबरदस्त जयगड | Darya Firasti