
एक क्षण कल्पना करा … कोकणात मराठेशाहीतील एका बुलंद किल्ल्याच्या कोटावर तुम्ही उभे आहात… जरीपटका झेंडा फडकतो आहे.. आणि तुमचं मन छत्रपती शिवाजी महाराजांच्या, कान्होजी आंग्र्यांच्या काळात जातं.. एका बाजूला तुम्हाला धीरगंभीर नदीचं पात्र दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला क्षितिजावर आकाशात विलीन होणार अथांग सागर दिसतोय… मासेमारी करणाऱ्या होड्या पश्चिमेकडे निघाल्या आहेत… आकाशात ढगांचे पुंजके कापसाप्रमाणे पसरले आहेत.. आकाश निरभ्र आणि त्याची निळाई गडद होत जाते आहे.. तुमच्या मनाच्या आसमंतात तुतारी आणि रणशिंग वाजते आहे.. नगारखान्यावरून युद्धघोष केला जातोय.. आणि मराठा आरमाराची तुकडी … त्यातील गलबते, शिबाडे, गुराबा इंग्लिश आरमारावर तुटून पडत आहेत.. आणि मग तुमचे मन वर्तमानकाळात येते.. समोर असलेले पडके बुरुज, झाडोरा माजलेले दरवाजे आणि खंदक, मंदिरे, पडके वाडे … सगळंच जिवंत भासू लागते. १७ व्या शतकातील निव्वळ पडके अवशेष आपण पाहत नसून इतिहास रुपी टाइम मशीनमध्ये बसण्याची संधी आपण घेत आहोत याची कदाचित जाणीव आपल्याला होईल.. आणि मग किल्ल्याच्या बांधणीतील एक एक रचना, शिल्पं, बारकावे आपण अधिक समरसून पाहायला लागू.

जयगड गावातून उजवीकडे एक रस्ता जयगड बंदर आणि जेट्टीकडे जातो, त्याला उजव्या हाताला ठेवून सरळ गेलं की आपण जयगड किल्ल्याच्या महाद्वाराजवळ जाऊन पोहोचतो. तिथं आत शिरण्याआधी उजवीकडे एक दरवाजा, तटबंदी आणि खंदक आपल्याला दिसतो. जांभा दगडाच्या काळ्या चिऱ्यांनी केलेलं हे प्रमाणबद्ध बांधकाम आपलं लक्ष वेधून घेतं.

मुख्य दरवाजा इस्लामी धाटणीचा असून विजापुरी अंमलात याची बांधणी झाली असावी असे भासते. त्यावर कमळाची दोन शिल्पे कोरलेली दिसतात आणि सोबत फुलांचे एक शिल्पही आहे. मुख्य दरवाजाच्या वरती दोन मजल्यांचे बांधकाम आहे जे ब्रिटिशांच्या काळात विश्रामगृह म्हणून वापरले जात होते.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर विस्तीर्ण मैदान दिसते त्यात एक कोरडा हौद, पडक्या वाड्याची जोती आणि गणेश मंदिर आपल्याला दिसते. ही बांधकामे पाहण्याआधी किल्ल्याच्या तटावरून गडफेरी करायची. एका ठिकाणी असलेली मोकळी जागा सोडली तर सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची ही गडफेरी २५ मिनिटांत करता येते. शास्त्री नदी आणि तिच्या मुखाचे मोहक दृश्य आपण तटावरून पाहू शकतो. शास्त्री नदीच्या तीरापलीकडे तवसाळ आणि रोहिले हे समुद्रकिनारे आपल्याला दिसतात.
किल्ल्याच्या प्रांगणात एक तीन मजली बांधकाम, जुन्या वाड्याची जोती आणि दोन विहिरी दिसतात. या विहिरींमध्ये बारमाही पाणी असते.

या विहिरींच्या जवळच एक गणेश मंदिर आहे. त्याच्या दोन दीपमाळांपैकी एक सुस्थितीत असून एकाचे तुकडे तिथेच विखुरलेले दिसतात. मंदिरातील गणेश मूर्ती पाहून प्रसन्न वाटते. तिथंच काही क्षण बसून ध्यानस्थ होण्याची अनिवार इच्छा मला झाली.

मंदिराच्या समोरच तटबंदीला लागून अजून एक देऊळ सदृश ठिकाण आपल्याला दिसते. ते आहे किल्लेकर बाबाचे मंदिर किंवा जयबाचे स्मारक. बहुतेक आदिलशाहीच्या काळातील एका दंतकथेप्रमाणे हा किल्ला बांधत असताना बांधकाम वारंवार ढासळत होते. शेवटी नरबळी देऊन यावर तोडगा काढायचे ठरले. जयबा नावाचा महार यासाठी पुढे आला आणि त्याने अट घातली की किल्ल्याला त्याचे नाव दिले जावे. आजही या ठिकाणी पूजा अर्चा होते. पण या कथेला ऐतिहासिक आधार नाही. अर्थात आपल्या परंपरेत अनेक गोष्टी मौखिक परंपरेने लोकांच्या स्मृतीचा भाग झाल्या आहेत.

किल्ल्याच्या बुरुजांखाली बांधलेल्या खोल्या आहेत आणि माडीचे बुरुजही आहे जे बऱ्याच प्रमाणात विजयदुर्ग किल्ल्यावरील बुरुजांसारखे दिसतात. ही सगळी बांधकामे चांगल्या परिस्थितीत असल्याने नीट निरीक्षण करून त्यांचे वैशिष्ट्य समजून घेता येते.
जयगड किल्ल्याचे दोन भाग आहेत. आपण आत्तापर्यंत पाहिला तो मुख्य किल्ला आणि शास्त्री नदीच्या पात्राशी बांधलेला पडकोट. मुख्य किल्ल्याच्या सर्व बाजूला खंदक आहे आणि आता त्यात बराच झाडोरा माजलेला दिसतो. हल्ला करणाऱ्या शत्रूने तटाला जाऊन भिडू नये यासाठी ही खंदकाची रचना केलेली दिसते. किल्ल्याच्या बुरुजांचे बांधकाम पाहत आपण जयगडाच्या इतिहासात डोकावतो
किल्ल्याचे बांधकाम आदिलशाहीत झाले. त्यानंतर संगमेश्वराच्या नाईकांनी हा किल्ला १५७८-८० च्या आसपास जिंकला. त्यानंतर विजापूरकरांना जयगड पुन्हा मिळाला नाही. शिवकाळात बालेकिल्ल्याचे बांधकाम झाले असे अभ्यासक मानतात. १६९५ मध्ये जयगड कान्होजी आंग्रेंच्या ताब्यात होता. छत्रपती शाहू महाराज, कान्होजी आंग्रे आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे किल्ला आंग्रेंच्या कडे कायम राहिला. सेखोजी आंग्रे १७२९ मध्ये तर संभाजी आंग्रे १७३४ मध्ये किल्ल्यावर आले असे कागदपत्रे सांगतात. १८१८ मध्ये किल्ला इंग्लिशांच्या ताब्यात गेला ( रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा – सचिन विद्याधर जोशी पृष्ठ क्रमांक ५५)

जयगडाच्या बालेकिल्ल्याला १४ बुरुज आहेत तर बंदराजवळ असलेल्या पडकोटाला १० बुरुजांची तटबंदी आहे. आज या तटांमध्ये जयगड गाव वसलेले आहे. तिथं समुद्राकडे उघडणारा दरवाजा आहे आणि सुंदर गोलाकार बुरुजांची मालिकाच.

जयगडाचा बालेकिल्ला आणि पडकोट पाहून मी जयगड बंदराकडे आलो. सकाळी साडेसातची वेळ. तवसाळच्या किनाऱ्यापलीकडे सूर्यनारायण डोकावू लागले होते.

शास्त्री नदी फेरीने पार करून तवसाळ-रोहिले-नरवण-हेदवी असा प्रवास करत मोदक खायला गुहागर गाठायचे होते. तांबूस वाळू असलेला सुंदर रोहिले किनारा आवर्जून पाहण्याजोगा आहे. त्याबद्दल या ब्लॉगवर नक्की वाचा. जयगड बंदराजवळच २० किलोमीटर अंतरावर कोळिसरे नावाचे गाव आहे. तिथं लक्ष्मीकेशवाचे अप्रतिम मंदिर आणि मूर्ती आहे ती सुद्धा पाहायला विसरू नका.रेवस ते तेरेखोल या टप्प्यातील अशा अनेक ठिकाणांची चित्रकथा वाचायला दर्या फिरस्ती साईटला भेट देत रहा.
Pingback: अंजनवेलचा गोपाळगड | Darya Firasti
Jaigad maze Maher.
Pingback: कहाणी शास्त्री नदीची | Darya Firasti