
गुहागर, वेळणेश्वर, हेदवी ही सर्व ठिकाणे पर्यटन नकाशावर तशी प्रसिद्ध आहेत. पण या भागात एक अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे तो म्हणजे पालशेत गावचा किनारा. गुहागरच्या दक्षिणेला असगोळी गावानंतर हे ठिकाण येते. इथून पुढे बुधल, अडूर वगैरे ठिकाणे पाहत आपण हेदवीच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. या गावातील एक खास पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे इथले पुरातन बंदराचे अवशेष.

या ठिकाणी ना नदी दिसते, ना खाडी ना समुद्र मग हे बंदर कुठून आलं? पेरिप्लस सारख्या प्राचीन पुस्तकांममधून आपल्याला कोकणात असलेल्या प्राचीन बंदरांची माहिती मिळते. दुसऱ्या शतकापासून १६ व्या शतकापर्यंत या भागात पालपट्टमयी नावाचे बंदर होते. पुढं गाळ साचून ते बंद पडले असावे आणि काळाच्या पडद्याआड गेले असावे असा संशोधकांचा कयास आहे.

जांभा दगडातील पायऱ्यांसारखी रचना आणि दर ५-६ मीटर अंतरावर अर्धगोलाकार बुरुजांसारखी बांधणी हे या बंदराचे धक्के असावेत. इथं बोट बांधण्यासाठी तसेच सामानाची ने आण करण्यासाठी सोय केलेली दिसते. हे ठिकाण पाहण्यासाठी पालशेत गावातील लोकांना विचारले तर नेमके उत्तर मिळत नाही. पण मुख्य रस्त्यावर लक्ष्मीनारायण मंदिर विचारायचे आणि तिथं जवळच काही मीटर पुढे हे अवशेष आपण पाहू शकतो. अशा ठिकाणी योग्य प्रकारे उत्खनन केले गेल्यास कदाचित इतिहासाची अनेक दालने उघडतील. जुनी साधने, तंत्रज्ञान, लोकजीवन यावर प्रकाश टाकणारी माहिती मिळेल. कोकणात भ्रमंती करत असताना अशा अनेक विलक्षण जागा पाहण्याची संधी मिळते. आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत रहा आणि आमच्या कोकणातील चित्रभ्रमंतीमध्ये सहभागी व्हा ही कळकळीची विनंती.