
गुहागर आणि सभोवतालचा परिसर म्हणजे समुद्रवेड्या पर्यटकांसाठी पर्वणीच. स्वच्छ सागरतीर, नितळ पाणी, शुभ्र वाळू, त्यावर फेसाळणाऱ्या लाटा आणि अथांग सागर निळाई हे सगळं अनुभवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील या रम्य ठिकाणी हजारो पर्यटक येतात. गुहागरच्या दक्षिणेला फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे एक विलक्षण समुद्रकिनारा. असगोळी गावचा नितांत सुंदर सागरतीर. आणि या स्थानाला पावन करणारं महादेवाचं अस्तित्व.

समुद्राला लागूनच असलेलं अन सुंदर रंगरंगोटी केलेलं मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं. हे मंदिर पेशवेकालीन असावं हे बांधकामाच्या शैलीवरून लक्षात येतं. आवारात जाताच दगडी दीपमाळ आपलं लक्ष वेधून घेते. गर्भगृह आणि सभामंडपाच्या पुढे आता हल्लीच्या काळात बांधलेला मंडप आहे. मंदिराच्या सभोवताली दगडी तटबंदी आहे. या स्थानाचा उल्लेख पुराणांतील सह्याद्री खंड पोथीत तसेच गुहागर माहात्म्य नामक ग्रंथात आहे त्यामुळे जरी मंदिर पेशवेकालीन असले तरी हे स्थान प्राचीन आहे असं मंदिरात आलेल्या स्थानिक भक्तांनी सांगितलं.

कोकणात मंदिरांजवळ नेहमीच तळे किंवा विहिरींची रचना आहे असं दिसतं. इथेही मंदिराच्या मागच्या बाजूला दगडी कुंड आहे ज्याचे दोन भाग केलेले असावेत. या कुंडाला अरुणा आणि वरुणा अशी नावे आहेत. एका बाजूने माणसे तर दुसऱ्या बाजूने घोडे किंवा जनावरे पाणी पिऊ शकतील अशा प्रकारची ही रचना आहे. १७५३ मध्ये वैजनाथभट बिन परशुराम शारंगपाणी (खरे) यांनी मंदिराजवळ तळे, विहीर आणि धर्मशाळा बांधली अशी नोंद सापडते.

व्याडेश्वराचे मूळ शिवलिंग तीन भागांमध्ये भंग होऊन एक भाग अंजनवेल येथे गेला तो उद्दालकेश्वर किंवा टाळकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला तर एक भाग असगोळी येथे आला आणि तो बाळकेश्वर किंवा वालुकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला.

या परिसरातील शांतता अद्भुत मांगल्याचा अनुभव देते. खरंतर मी अज्ञेयवादी आहे. देव आहे की नाही हे मला ठाऊक नाही. पण अशा ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात, कोलाहल गोंगाटापासून दूर शांत चित्ताने काही क्षण बसणं हा ध्यानस्थ करणारा अनुभव असतो. असगोळीच्या खडकाळ किनाऱ्यावरून कोळीवाड्याची लगबग आणि गुहागरची पुळण पाहताना निसर्गाने चित्रकार होऊन हे सगळं रेखाटलं असेल असं वाटायला लागतं. अंजनवेलच्या टाळकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हा ब्लॉग वाचा. कोकण किनाऱ्यावरील अशा मोहक जागांच्या भटकंतीसाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत रहा.
संदर्भ
साद सागराची – गुहागर तवसाळ – २०१४ सुधारित आवृत्ती – बुकमार्क पब्लिकेशन्स पुणे
कोकणातील पर्यटन – प्र. के. घाणेकर
😍😍😍