
कधी कधी आपण खूप नियोजन करून, मॅपवर शोधून, माहिती घेऊन एखादे ठिकाण पाहायला जातो पण अपेक्षित असतं तितका भारी अनुभव येत नाही. पण कधीकधी याच्या अगदी बरोबर उलट अनुभव मिळतो. पंचनदी गावातील सप्तेश्वर मंदिराचं म्हणाल तर माझा अनुभव अगदी तसाच आहे. गुहागरकडून दापोलीकडे निघालो होतो. वसिष्ठी नदी ओलांडून दाभोळला आलो आणि तिथून कोळथरेच्या दिशेने निघालो. कोळथरे आमचे गाव आणि कोळेश्वर आमचे कुलदैवत या आमच्या गावाजवळच पंचनदी नावाचे गाव आहे. नाव ऐकून होतो पण कधी दाभोळच्या दिशेने कोलथरेला आलोच नाही त्यामुळे इथं पोहोचलो नाही. यावेळी योग आला आणि पंचनदी गावात शिरल्यानंतर दगडी तटबंदीतील शंकराचे एक जुने मंदिर आणि तिथं असलेली पुष्करिणी दिसली. गाडी पार्क केली आणि मंदिर पाहायला आत गेलो. मंदिर तर महादेवाचे आहे पण इथल्या पंचायतनात इतरही देवता आहेत. श्री विष्णूचे मंदिर पाहायला आत डोकावलं तर अतिशय सुंदर अशी केशव रूपातील प्राचीन विष्णुमूर्ती दिसली.
पद्म, शंख, चक्र आणि गदा या क्रमातील आयुधे म्हणजे विष्णूचे केशव स्वरूप. मूर्तीच्या डाव्या बाजूला लक्ष्मी तर उजव्या बाजूला गरुडाचे शिल्प आहे. पाषाणात कोरलेल्या या मूर्तीत प्रभावळीवर मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम असे दशावतार कोरलेले दिसतात. लाकडी फ्रेम्सवर तोललेलं कौलारू छत एक सुंदर भौमितीय रचना निर्माण करतं.

मंदिरातील खांबांवरही सुंदर कोरीव काम आहे. पाषाणात घडवलेला नंदी आहे आणि काही पायऱ्या उतरून खाली शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या बाहेर गणेशमूर्ती आहे. आपण खरंच देवाच्या घरी राहायला आलो आहोत असं वाटावं असं मांगल्यमय वातावरण इथं अनुभवता येतं.

लाकडी स्तंभांवर कौलारू छप्पर आहे आणि त्यामुळे सभामंडपात सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते. सभामंडपात भक्तांना बसायची जागा आहे आणि लाकडी कठड्याचा आधार आहे.

मंदिराच्या आवारात जांभा दगडात बांधलेली प्रमाणबद्ध चौकोनी पुष्करिणी आहे. कोकणातील जवळजवळ सर्वच मंदिरांमध्ये विहीर किंवा पुष्करिणी असतेच. पाण्याच्या पातळीपर्यंत सहज पोहोचता यावे याकरिता पायऱ्या बांधलेल्या असतात. मंदिरात कोकणातील ठराविक रचनेच्या दीपमाळा इथेही दिसतात.

सप्तेश्वर हे शिंत्रे, दीक्षित (मनोहर) कुटुंबियांचे कुलदैवत मानले जाते. कोकणात हिंडताना अशाच अप्रतिम ठिकाणांची माहिती आणि फोटो पर्यटकांना पाहता यावेत यासाठी रेवस ते तेरेखोल या संपूर्ण किनारपट्टीत भ्रमंती करून आम्ही दर्या फिरस्ती हा ब्लॉग तयार केला आहे. कोकणाशी घट्ट नातं असलेल्या सगळ्यांना जगभरात कुठेही ही माहिती मिळावी हाच आमचा उद्देश आहे. तेव्हा तुमचे मित्र, आप्तेष्ट, कोकणवेडे भटके लोक यांना आमच्या ब्लॉगची लिंक नक्की पाठवा ही आग्रहाची विनंती.
अतिशय सुंदर कोकण
स्वातंत्रदिन चिरायू!होवो
खूप छान माहिती दिलीत सप्तेश्वर मंदिराची… मी एकदाच जाऊन आलो इथे,,10 वर्षे होवून गेली त्याला,,पण हे ठिकाण,, आठवणी मधून,, स्वप्नामधून जातच नाही.. याच मंदिरात आमचा कार्यक्रम होता नमनाचा…
पण ते ठिकाण इतकं शांत आणि सुदंर आहे की तिथे पुन्हा पुन्हा जावे,,,तिथे परत जाऊन आल्याशिवाय समाधान मिळणार नाही…
तुमच्यामुळे त्या मंदिराचे नाव माहीत झाले,,आणि फोटो ही पाहता आले,,,जे फक्त नजरेत आणि मनातच साठवले होते….
त्यातल्या एका मंदिराला खिळ्यांचा वापरच केलेला नाहीये..खरंच सुंदर नुमना आहे तो वास्तूशास्त्रातला…
खरंच मनापासून धन्यवाद 🙏