Darya Firasti

हेदवी ची बामणघळ

हेदवी हे गाव तिथल्या दशभुज गणपती मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पण तिथून साधारणपणे दोन किमी पश्चिमेला असलेला तिथला समुद्रकिनाराही आवर्जून भेट द्यावी असाच आहे. छोटासाच शांत समुद्रकिनारा आणि त्याला लागून असलेले उमामहेश्वराचे देऊळ. पर्यटकांची गर्दी इथं सहसा नसते. ग्रामपंचायतीने बांधलेल्या पार्किंगमध्ये वाहन ठेवून किनारा पाहायला चालत निघायचे. उत्तर दक्षिण दिशेने चंद्रकोरीच्या आकारात पसरलेला हा किनारा जेमतेम अर्ध्या तासात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत पाहता येतो. ओहोटीच्या वेळेला स्वच्छ पुळणीवर चालता येते. भरतीला मात्र किनाऱ्याच्या आतवर लाटा येतात.

भरतीच्या वेळेला पूर्ण किनारा समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांनी व्यापलेला असतो. किनाऱ्यावर वाळूत असलेल्या खडकांमधून खळखळणाऱ्या लाटा वाट काढत येत राहतात. पावसाळ्यात तर हे ठिकाण अधिकच गूढ रम्य वाटते. निळ्या आकाशने राखाडी रंग ल्यालेला असतो. एक प्रकारची खिन्नता आसमंतात पसरलेली असते; भरतीच्या लाटांना उधाण येऊन विशेष जोर चढलेला असतो. सूर्य भर दुपारी तळपण्याऐवजी ढगांच्या आवरणामागे लपलेला असतो. आपण सागराचे रौद्र रूप पाहता पाहता दंगून गेलेले असतो.

या किनाऱ्याच्या उत्तर टोकाला जिथं पायवाट संपते तिथं उमामहेश्वराचे दर्शन घेऊन पलीकडे असलेल्या कातळावर आपण चढून जाऊ शकतो. काळ्याकभिन्न राकट रांगड्या या समुद्र कातळांचे सौंदर्य आपले लक्ष वेधून घेत असते. पण चालत असताना या ओबडधोबड खडकांवर पसरलेल्या शेवाळ्याकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक चालावे लागते. सुमारे १०० मीटर पुढे गेल्यावर आपल्याला कातळ पठारावर सुमारे ३०-३५ फूट लांब आणि २ फूट रुंद अशी घळ दिसते. हीच हेदवीची प्रसिद्ध बामणघळ होय.

या जागेला बामणघळ नाव पडण्यामागे एक आख्यायिका आहे. त्याचा काळ कोणता, गोष्टीतील ब्राह्मणाचे नाव काय कशाचाही पत्ता नाही. मौखिक परंपरेने जपलेली अशी एक गोष्ट आहे. एकदा रात्री इथून एक ब्राह्मण प्रवासी एकटाच मार्गक्रमण करत होता. इथं घळ आहे याची त्याला कल्पना नव्हती. पाय घसरून तो घळीत पडला व जखमी झाला.. घळीची खोली ८ ते १० फूट तरी असावी आणि भरतीची वेळ असेल तर लाटांनाही प्रचंड जोर असतो. तिथं जखमी होऊन पडलेला तो दुर्दैवी ब्राह्मण तिथून बाहेर पडू शकला नाही व त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. घळीतील दगड चिखलाने माखले होते. तेव्हा पासून या जागेला बामणघळ असं नाव पडलं.

निसर्गाचे वेळेप्रमाणे बदलते रूप पाहायचा अनुभव आपल्याला इथं घेता येतो. ओहोटीच्या वेळेला सगळं कसं अगदी शांत शांत असतो.. पण भरतीच्या वेळेला मात्र या खडकांवर आदळणाऱ्या लाटांचा आवेश पाहून थरकाप उडतो म्हंटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. घळीच्या दोन्ही बाजूला असलेल्या खडकांवर लाटा प्रचंड आवेगाने आपटतात आणि भीतीदायक आवाज निर्माण करतात.. तर घळीच्या पोकळीत घुसणारे पाणी गर्जना करत पुढे जाते. घळीतील पोकळी हळूहळू पाण्याने भरली गेल्याचा आवाज येतो.. आणि मग सगळी जागा व्यापून पाण्याला आत शिरायला जागा उरली नाही की जवळपास २० फूट उंच जलस्तंभ इथं पाहायला मिळतो. समुद्राचे पाणी कारंजे असल्यागत उंच उसळते आणि आजूबाजूच्या खडकांवर वेगाने सांडते.. दगडांतील छोट्यामोठ्या कपारी फेसाळलेल्या पांढऱ्या पाण्याने भारतात आणि हे पाणी उतारावरून पुन्हा समुद्रात उतरले की मोकळ्या होतात.

मी तीन वेळा हेदवीला गेलो पण एकदाच मला जलस्तंभ पाहता आला. याचं कारण म्हणजे पूर्ण भरतीची वेळ गाठली तरच इतके मोठे कारंजे पाहता येते. साधारणपणे तिथीच्या पाऊणपट वेळ ही भरतीची वेळ असते. त्याच्या तासभर आधी किनारा गाठायचा आणि घळीच्या जवळ जाऊन बसायचे. काही जण म्हणतात की इथं जवळपास ४० फूट उंच फवारे दिसतात. मला ही थोडी अतिशयोक्ती वाटते. गेल्या वेळेला मी आधी तिथी पाहिली आणि भरती-ओहोटीच्या वेळा पाहिल्या. त्याचबरोबर भरतीची उंची किती आहे याचे कोष्टकही पाहिले. या पूर्वतयारीचा नक्कीच उपयोग झाला.

पावसाळ्यात इथं भरतीची उंची साडेतीन चार मीटर वर जाते त्यामुळे उंच फवारे पाहता येतात असा माझा कयास आहे. प्रा. प्र. के. घाणेकरांच्या पुस्तकात त्यांनी खूप सोपा हिशेब मांडला आहे. पौर्णिमा अमावास्येला दुपारी १२ वाजता … अष्टमी ते द्वादशी सकाळी आणि षष्ठीला आलं तर दुपारी चारच्या सुमारास चांगली भरती पाहता येते असं ते सांगतात.

गुगल अर्थ सारखे डिजिटल टूल वापरले तर सॅटेलाईट फोटोग्राफ मध्ये ओहोटीच्या वेळेला स्पष्ट दिसणारी घळ पाहता येते. प्राध्यापक श्रीकांत कार्लेकरांनी इथं भौगोलिक संशोधन करून इथल्या ‘जिओ’ चा वेध घेतला होता. हेदवीच्या दगडी शिल्पांची, तिथल्या गुहेची त्यांनी सुंदर माहिती दिली आहे. अशीच भूरूपे वेळणेश्वर आणि कोर्लई येथे असल्याचे ते सांगतात. त्यांच्या समुद्राशोध या मराठी पुस्तकात आणि Coastal Geomorphology of India या इंग्लिश पुस्तकात कोकण आणि भारतातील किनारपट्टीची सविस्तर माहिती मिळते. या खडकाळ किनाऱ्यांवर बारनॅकल, ऑयस्टर, लिंपेट, सबिलेरिया, सी अर्चिन आणि विविध खेकडे असे वैविध्यपूर्ण प्राणीजीवन पाहता येते. गल, टर्न, व्हेडर, हेरॉन, सी इगल्स असे विविध पक्षी पाहता येतात. अन्नसाखळीत सर्वात वर असलेले त्यातले मुख्य म्हणजे शुभ्र सागरी गरुड.. यांच्यापैकी एकाच्या तडाख्याने माझे ड्रोन २०१९ मार्चमध्ये बाणकोट किल्ल्याजवळ क्रॅश झाले होते, जवळच कुठंतरी त्यांचं घरटे असेल. माझ्या कोकण भ्रमंतीमध्ये इथल्या फ्लोरा फौना कडे थोडेसे दुर्लक्ष झाले आहे हे मला प्रांजळपणे मान्य करावे लागेल.. कदाचित एखाद्या जाणकार माणसाची साथ फील्डवर्क वर मिळाली तर ही चूक सुधारता येईल. माझ्या गुहागर-वेळणेश्वर-हेदवी परिसरातील वास्तव्यात श्याम आठवले आणि गोपाळकृष्ण गोखले यांची खूप मदत झाली. त्या दोहोंच्या होम स्टे मध्ये जरूर राहा असे मी सांगीन. गोपाळकृष्ण गोखलेंचा इंजिनिअर फोटोग्राफर असलेला मुलगा उन्मेष माझा खास दोस्त.. माझी वीजेची गाडी चार्ज करायला त्याने मदत केली. भटकंती करून दमल्यानंतर वेळणेश्वर किनाऱ्यावर विक्रांत गोखलेंच्या कल्पतरूमध्ये मिसळ झोडायला नक्की जा.

One comment

  1. Pingback: हेदवीचा उमामहेश्वर | Darya Firasti

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: