Darya Firasti

भिवबंदरचा अपरिचित सागरतीर

रेवस ते तेरेखोल या किनारपट्टीतील अगदी मोजके समुद्र किनारे शिल्लक असतील जिथे दर्या फिरस्ती करत मी गेलो नसेन. या वेळेला असे दोनतीन किनारे पाहिले. त्यापैकी सगळ्यात वेगळा आणि नितांत सुंदर असलेला किनारा म्हणजे दाभोळ जवळचा भिव बंदर. गुगल मॅपवर नीट पाहिले तर इथे एक छोटीशी पुळण दिसतेच. मुख्य मार्गापासून किनाऱ्यापर्यंत नेणारा एक कच्चा गाडी रस्ताही दिसतो. चंडिका देवीच्या सड्या पासून पश्चिमेला उतारावर हा मार्ग जातो. अगदी आमच्या कोळथरे गावासारखाच पण तुलनेने रस्ता थोडा रुंद आणि काही ठिकाणी कच्चा असला तरीही कमी उतार असलेला.

साधारणतः डोळ्यांना शुभ्र वाळू, फेसाळलेल्या लाटा आणि निळे आकाश आणि त्यात स्वच्छ कापूस पसरावा तसे दिसणारे ढग असे चित्र आवडते. उपग्रह प्रतिमेत इथे काळी वाळू आहे असे लक्षात आले होते त्यामुळे ठिकाण फार सुंदर असेल असे आधी वाटले नाही. किनाऱ्याचा आकार अगदी छोटाच. सुमारे चारशे ते पाचशे मीटर चालले की किनाऱ्याची दोन्ही टोके पाहता येतात इतपतच त्याचा व्याप. चार जूनला मी दुपारी साडेचार पावणेपाच च्या सुमारास तिथे पोहोचलो असेन. सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता, पण तिथून सूर्यास्त दिसलाच नसता कारण उत्तरेकडे सरकलेले सूर्यबिंब भिव बंदर किनाऱ्याच्या मिठीत मावत नव्हते. सूर्य महाराज आघारीच्या डोंगरामागे कुठेतरी क्षितिजाकडे सरकत असावेत.

ही पुळण काहीशी पूर्व-पश्चिम पसरलेली असून इंग्लिश अक्षर सी च्या आकारात डोंगरानी किनाऱ्याला कोंदण घातले आहे. त्या वेळेला ओहोटी असल्याने किनाऱ्यावर उतरणाऱ्या छोट्याशा झऱ्याला पायीच ओलांडून किनाऱ्यावर सहज आलो. काळ्या वाळूने ओसरलेल्या पाण्याची तलम चादर पांघरली होती… आणि त्यामुळेच आकाशाचे प्रतिबिंब त्या वाळूवर उमटले होते. लाट आली की या प्रतिमेची रांगोळी काहीशी विस्कटत असे आणि लाट ओसरून गेली की प्रतिबिंब पुन्हा दिसू लागे.

ज्येष्ठातली ती एक रम्य संध्याकाळ होती.. मी तिथी पाहिली तर ज्येष्ठ वद्य चतुर्थी.. मला दुर्गाबाई भागवतांचे ऋतुचक्र आठवले.. कोकणात हिंडताना या पुस्तकाची आठवण करून देणारे अनेक क्षण येतात. ज्येष्ठातील पहिल्या मेघमंडळाचे वर्णन करताना दुर्गाबाई म्हणतात, “संध्याकाळी कुठे इथे तिथे भटकणारी काळसर अभ्रखंडे आता पांढरी होऊन विशाल आकाशाला गवसणी घालत आहेत… छायाप्रकाशाचा खेळ भारतासारख्या उष्ण देशात नेहमीच लोभनीय असतो. पण छायाप्रकाश एक झालेले हे कुंद वातावरणही निराळ्याच शोभेने नटलेले असते. ते मोरांना उन्मत्त करते.. समुद्रांना उचंबळून सोडते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला लवकर अंजनवेल गाठून गोपाळगड पडकोट आणि टाळकेश्वर मंदिराच्या बाजूलाच असलेला डॉलफिन पॉइंट पहायचा होता.. ही दोन्ही ठिकाणे समोरच वाशिष्ठी नदीच्या मुखाशी स्पष्ट दिसत होती. मावळतीला आलेल्या सूर्याची किरणे अंजनवेलच्या माथ्याला उजळून टाकत होती. ते अप्रतिम दृश्य कॅमेरात टिपून, आणि कॅमेरात न टिपता येणारा तो अनुभव मनाच्या दैनंदिनीत नोंदवून मी परतीच्या प्रवासाला निघालो.

Leave a Reply

Discover more from Darya Firasti

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading