Darya Firasti

कोळोशीची अद्भुत गुहा

काही ठिकाणे अशी असतात की कुठेतरी त्यांचा एखादा फोटो पाहिला की तिथं जाऊन ती जागा प्रत्यक्ष पाहण्याची ओढ मनात निर्माण होते. गर्द रानातील एक गुहा आणि तिच्या वरच्या भागात असलेल्या छिद्रातून आत येणारा प्रकाशाचा तेजस्वी झोत असे कोळोशीचे रूप मी २०१९-२०२० च्या आसपास एका बातमीत पाहिले. त्या सुमारास मी रत्नागिरी-राजापूर भागातील कातळशिल्पांची ड्रोन फोटोग्राफी करत होतो. या अप्रतिम आणि गूढरम्य कातळशिल्पांच्या निर्मितीसाठी जी अश्मयुगीन हत्यारे वापरली गेली असतील ती हत्यारे या गुहेत संशोधकांना सापडली होती. कोकणच्या इतिहासातील एक बंद कप्पा या दोन पुरातत्व ठेव्यांनी आता संशोधनासाठी उघडला होता. कोकणचा इतिहास सांगायचा झाला तर आपल्या डोळ्यांसमोर समुद्रकिनाऱ्यावरील किल्ले, बंदरे, प्राचीन देवळे किंवा व्यापारी मार्ग उभे राहतात. पण या सगळ्यांच्याही आधीचा एक काळ आहे. असा काळ, जेव्हा या किनाऱ्यावर राज्ये नव्हती, गावांची नावे नव्हती, शेती नव्हती आणि लेखी इतिहासही नव्हता. त्या काळाचा शोध कागदोपत्री नोंदींमध्ये मिळत नाही; तो मिळतो दगडांत, मातीच्या थरांत आणि निसर्गाने लाखो वर्षांत घडवून ठेवलेल्या भूआकारांत. या गुहेचे महत्त्व केवळ येथे सापडलेल्या दगडी हत्यारांपुरते मर्यादित नाही. कोकणचा भूगर्भीय इतिहास, त्यातून घडलेली भूरचना आणि त्या भूप्रदेशाशी जुळवून घेतलेले मानवाचे प्रारंभीचे जीवन – या तिन्हींचा अभ्यास एका ठिकाणी करण्याची संधी कोळोशी देते.

पुढे २०२५ मध्ये ही गुहा पाहण्याचा योग आला. मुंबईतून निघायला उशीर झाला असल्याने मी राजापूरलाच मुक्काम केला होता. सकाळी लवकर निघालो, वाटेत खारेपाटण येथे सूर्य मूर्तीचे दर्शन घेतले आणि नांदगाव फाट्याला उजवीकडे वळून निपाणी देवगड महामार्गाला लागलो. कोळोशीचा एसटी थांबा आला तिथं विठ्ठल-रखुमाई मंदिरापाशी गाडी पार्क केली आणि रुपेश दादाची वाट पाहू लागलो. एक फक्कड चहा रुपेश दादाबरोबर घेतला आणि मग कोळोशीचा डोंगर चढायला सुरुवात केली. इथं एक गोष्ट नक्की नमूद केली पाहिजे की ही जागा एकट्याने जायला सुरक्षित नाही. वाट सापडणे कठीण आणि परिसरातील जंगलात जंगली श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे गावातून माहितगार गाईड घेऊन जाणे उत्तम. रुपेश तांबे यांना तुम्ही या +91 93563 93676 क्रमांकावर जाण्याच्या एकदोन दिवस आधी व्हाट्सअप द्वारे संपर्क करून विचारू शकता.

ही गुहा पाहून उतरताना काढलेला हा जीपीएस ट्रॅक तुम्ही पाहिलात तर लक्षात येते की गुहा जवळजवळ 225 मीटर उंचीवर आहे म्हणजे साधारणतः साडेसातशे फूट आणि त्यापैकी 132 मीटर उंच टेकडी म्हणजे सुमारे साडेचारशे फूट आपल्याला रस्त्यापासून चढून जावी लागते. रुपेश बरोबर हा प्रवास सुमारे तासाभरात पार पडला आणि आम्ही उन्हाचा दाह वाढायच्या आधीच गुहे जवळ पोहोचलो. झाडांच्या गर्दीत हे ठिकाण लपलेले असल्याने पटकन गुहेचे प्रवेश स्थान लक्षात येत नाही. इथे कोणीही एकटे जाऊ नये. काटेरी झुडुपांतून रस्ता जातो. रानडुकरे आहेत.. बिबटे सुद्धा असावेत.. डुकरे शेतीचे नुकसान करतात त्यामुळे त्यांना हाकलावे लागते. आम्हाला उतरत असताना उजव्या बाजूच्या झाडीतून फटाक्यासारख्या आवाज आला.. डुकरांची शिकार करायला ग्रामस्थांचे एक टोळके आले असणार असे रुपेशचे म्हणणे होते.

वर पोहोचलो तेव्हा लक्षात आले की गुहा बरीच प्रशस्त आहे. साधारणपणे ४० मीटर लांबी, २५ मीटर रुंदी आणि ५ ते ८ मीटर उंची असा या गुहेचा विस्तार आहे. कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनातून या गुहेचा शोध लागला. गेल्या दशकात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लॅटेराइटच्या पठारांवर शेकडो प्राचीन कातळशिल्पे सापडली. हत्ती, गेंडे, हरणे, मानवी आकृती, भूमितीय रचना आणि इतर अनेक प्रतिमा असलेल्या या कातळशिल्पांनी जगभरातील पुरातत्त्वज्ञांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने आणि विविध संशोधकांनी या परिसरात अधिक सखोल पाहणी सुरू केली. याच संशोधन मोहिमेदरम्यान कोळोशी परिसरातील जंगलात ही नैसर्गिक गुहा लक्षात आली. गुहेमध्ये प्राथमिक पाहणीदरम्यान जमिनीवर दगडी अवजारे दिसू लागली. त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करण्यात आले. प्रत्येक मातीचा स्तर काळजीपूर्वक नोंदवून, त्यातील वस्तूंची जागा, खोली आणि संदर्भ जतन करण्यात आले. अशा प्रकारचे स्तरशास्त्रीय (Stratigraphic) उत्खनन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण कोणती वस्तू कोणत्या काळातील आहे याचा अंदाज केवळ त्या वस्तूवरून नव्हे, तर ती कोणत्या स्तरातून सापडली यावरही अवलंबून असतो.

येथे सापडलेली अश्मयुगीन गुहा आणि त्यामधून मिळालेली एक लक्ष वीस हजार दगडी अवजारे यामुळे कोकणातील मानवाच्या प्रागैतिहासिक जीवनाचा एक नवा अध्याय उलगडू लागला आहे. अजिंठा, वेरूळ किंवा कान्हेरीसारख्या दगडात कोरलेल्या लेण्या या ऐतिहासिक काळातील स्थापत्यकलेचे अद्भुत नमुने आहेत; परंतु कोळोशीची गुहा त्यापेक्षा हजारो वर्षे जुनी आहे. ही कोणत्याही राजाने किंवा भिक्षूंनी घडवलेली लेणी नसून, निसर्गनिर्मित गुहा आहे जिचा वापर आदिमानवाने आश्रयस्थान म्हणून केला असावा. माध्यमांमध्ये या गुहेच्या वयाबाबत वेगवेगळे आकडे प्रसिद्ध झाले. काही ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार वर्षांपर्यंतचे उल्लेख आहेत, तर काही ठिकाणी दहा ते वीस हजार वर्षांचा कालखंड सांगितला आहे. या फरकाचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. दगडी अवजारे आणि त्यांचे तंत्रज्ञान यांवरून प्राथमिक कालमानाचा अंदाज बांधता येतो; मात्र अचूक कालमापनासाठी स्तरांचा आणि इतर नमुन्यांचा स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास आवश्यक असतो. म्हणूनच संशोधकांनी या गुहेचे निश्चित वय सांगताना नेहमीच सावध भूमिका घेतली आहे. लोकप्रिय माध्यमांतील मथळे आणि वैज्ञानिक निष्कर्ष यांतील हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. नव्या अभ्यासानुसार या गुहेचा कालावधी 4800 वर्षे ते 18000 वर्षे जुना असू शकतो.

कोळोशीच्या गुहेत उभे राहिल्यावर सर्वप्रथम नजरेत भरतात ते तिचे खडक. काही क्षणांनी त्या खडकांमागचा भूगर्भीय इतिहास जाणवू लागतो. आणि थोडा वेळ त्या जागेत शांत उभे राहिल्यावर लक्षात येते की या गुहेचे खरे महत्त्व तिच्या आकारात नाही, तर तिच्या जतन केलेल्या स्मरणात आहे. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या ज्वालामुखी उद्रेकातून तयार झालेल्या खडकांना पाऊस, वारा आणि अपक्षय यांनी आकार दिला. त्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या या नैसर्गिक निवाऱ्यात हजारो वर्षांपूर्वी मानव आला. त्याने दगड घडवले, त्यांचा वापर केला आणि निघून गेला. त्याच्या वास्तव्याच्या कथा आज उपलब्ध नाहीत; पण त्याने घडवलेल्या दगडांवर त्याच्या अस्तित्वाची नोंद मात्र अजूनही आहे. Quartzite, chert, chcedony, basalt, quartz असे सगळे स्थानिक दगड इथे सापडले आहेत. म्हणूनच कोळोशीचे महत्त्व केवळ एका गुहेपुरते मर्यादित राहत नाही. ती कोकणच्या इतिहासाची सुरुवात समजून घेण्याची संधी आहे. भूगर्भशास्त्र, भूगोल आणि पुरातत्त्व यांच्या संगमावर उभे असलेले हे स्थळ आपल्याला स्मरण करून देते की इतिहासाची पहिली पाने केवळ राजवटींनी लिहिलेली नसतात; ती निसर्ग आणि मानव यांनी मिळून दगडांवर कोरलेली असतात.

दगडी अवजारांची संख्या हा या गुहेचा एक महत्त्वाचा पैलू असला तरी त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे त्यांचा संदर्भ. पुरातत्त्वशास्त्रात एखादी वस्तू स्वतंत्रपणे फार काही सांगत नाही; ती ज्या स्तरातून सापडते, तिच्या आसपास काय आहे, कोणत्या प्रकारच्या अवजारांसोबत ती मिळते आणि त्या थरांची परस्पर मांडणी कशी आहे, यावरूनच तिचा अर्थ उलगडतो. म्हणूनच कोळोशी येथे उत्खनन करताना प्रत्येक स्तराची नोंद, प्रत्येक अवजाराचे स्थान आणि त्याचा संदर्भ काळजीपूर्वक जतन करण्यात आला. या पद्धतशीर कामामुळेच या गुहेकडे केवळ संग्रहित अवजारांचा संच म्हणून नव्हे, तर मानवी क्रियाकलापांच्या नोंदी जपणाऱ्या स्थळाच्या दृष्टीने पाहता येते. गुहेत सापडलेल्या अवजारांत आकार, तंत्र आणि उपयोग यांमध्ये लक्षणीय विविधता दिसून येते. काही अवजारे मोठ्या गोट्यांवर मर्यादित घाव घालून तयार केलेली आहेत, तर काहींमध्ये नियंत्रित तंत्राने धार निर्माण केलेली दिसते. काही सूक्ष्म दगडी पाती आकाराने इतकी लहान आहेत की ती स्वतंत्र साधन म्हणून नव्हे, तर लाकडी किंवा हाडाच्या दांड्यात बसवून संयुक्त हत्याराचा भाग म्हणून वापरली गेली असावीत, अशी शक्यता संशोधक व्यक्त करतात. अशा प्रकारची साधने केवळ दगड फोडण्याचे कौशल्य नव्हे, तर नियोजन, कच्च्या मालाची निवड आणि विशिष्ट कामासाठी विशिष्ट साधन तयार करण्याची क्षमता दर्शवितात.

ऋत्विज आपटे

या अवजारांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. दगड हा येथे केवळ कच्चा माल नाही; तो माहितीचा वाहक आहे. प्रत्येक घाव, प्रत्येक धार आणि प्रत्येक तुटलेला कडा हा त्या काळातील तंत्रज्ञानाचा पुरावा आहे. धातूंचा वापर सुरू होण्यापूर्वीचा हा जगण्याचा इतिहास आहे.

ऋत्विज आपटे

अनेकदा प्रागैतिहासिक स्थळांविषयी बोलताना लक्ष फक्त “किती हजार वर्षे जुने?” या प्रश्नावर केंद्रित होते. प्रत्यक्षात तो सर्वांत कमी महत्त्वाचा प्रश्न आहे. अधिक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या स्थळातून आपण मानवी जीवनाविषयी काय शिकतो. कोळोशी या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. येथे सापडलेली साधने मानवाच्या बुद्धिमत्तेची, निरीक्षणशक्तीची आणि बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची साक्ष देतात. ती केवळ दगड नसून विचारपूर्वक घडवलेली साधने आहेत. या गुहेचा अभ्यास कोकणच्या प्रागैतिहासिक संशोधनाला आणखी एका कारणामुळे महत्त्वाचा ठरतो. गेल्या दशकात कोकणातील जांभ्याच्या सड्यांवर सापडलेल्या कातळशिल्पांनी या प्रदेशाकडे जगाचे लक्ष वेधले. कोळोशीचा शोध हा त्याच व्यापक संशोधन प्रक्रियेचा भाग मानता येतो. सध्या उपलब्ध पुराव्यांवरून कातळशिल्पे निर्माण करणारे आणि कोळोशी गुहेचा वापर करणारे लोक एकच होते, असे म्हणता येत नाही. तसेच ते पूर्णपणे असंबंधित होते, असेही ठामपणे सांगता येत नाही. या दोन शोधांतील नाते समजून घेण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर सावध भूमिका घेणेच योग्य ठरते. कोळोशीची गुहा आपल्याला आणखी एका गोष्टीची आठवण करून देते. प्रागैतिहासिक संशोधन हे सतत बदलणारे क्षेत्र आहे. नवी उत्खनने, सुधारित कालमापन तंत्रे, सूक्ष्म अवशेषांचे विश्लेषण आणि भूगर्भीय अभ्यास यांमुळे आजचे निष्कर्ष उद्या अधिक स्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे कोळोशीविषयीची सध्याची माहिती अंतिम नसून एका मोठ्या संशोधनप्रवासाची सुरुवात आहे.

सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या ज्वालामुखी उद्रेकातून तयार झालेल्या खडकांना पाऊस, वारा आणि अपक्षय यांनी आकार दिला. त्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या या नैसर्गिक निवाऱ्यात हजारो वर्षांपूर्वी मानव आला. त्याने दगड घडवले, त्यांचा वापर केला आणि निघून गेला. त्याच्या वास्तव्याच्या कथा आज उपलब्ध नाहीत; पण त्याने घडवलेल्या दगडांवर त्याच्या अस्तित्वाची नोंद मात्र अजूनही आहे. म्हणूनच कोळोशीचे महत्त्व केवळ एका गुहेपुरते मर्यादित राहत नाही. ती कोकणच्या इतिहासाची सुरुवात समजून घेण्याची संधी आहे. भूगर्भशास्त्र, भूगोल आणि पुरातत्त्व यांच्या संगमावर उभे असलेले हे स्थळ आपल्याला स्मरण करून देते की इतिहासाची पहिली पाने राजवटींनी लिहिलेली नसतात; ती निसर्ग आणि मानव यांनी मिळून दगडांवर कोरलेली असतात. इतिहास आणि संस्कृतीच्या मागे जाणारे हे मानवी प्रवासाची कथा सांगणारे दालन आहे असे म्हणता येईल.

रुपेश दादा आणि इतर ग्रामस्थ मंडळींच्या मदतीने इथे पर्यावरणपूरक पर्यटनाचा विकास होऊ शकेल. गुहेकडे जाणाऱ्या रस्त्यात अनेक खासगी जमिनी आहेत आणि थोडी बागायती सुद्धा आहे, त्यामुळे गावकरी, ग्रामपंचायत आणि सरकारने एकत्र येऊन इथे नियंत्रित आणि सुरक्षित पर्यटन सुविधा – व्यवस्था देणे गरजेचे आहे. काही ठिकाणांची नैसर्गिक समृद्धता जपणे अतिशय आवश्यक असते त्यामुळे शेवटपर्यंत गाडी रस्ता वगैरे न करता पायवाट, माहितीकेंद्र किंवा छोटेसे संग्रहालय, खाण्यापिण्याची व्यवस्था, स्थानिक बाजारपेठेतील शेतकी आणि कलात्मक उत्पादने विक्रीची व्यवस्था अशा गोष्टी नक्कीच करता येतील. पण हे ठिकाण लोकप्रिय झाल्यानंतर इथे दिवसभरात किती लोक येऊ शकतील यावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि संपूर्ण परिसर आता आहे तसाच प्लॅस्टिक मुक्त ठेवावा लागेल.

कोळोशीची टेकडी उतरून मी पुन्हा गाडीकडे आलो तेव्हा माझी पँट आणि जॅकेट या काटेरी बियांनी भरून गेले होते. याला स्थानिक लोक कुत्र्याची बी किंवा काटेरी चिकटया म्हणतात. काही मित्रांच्या अंदाजाप्रमाणे ही रानभेंडी असावी. इथे येणारे प्राणी, पक्षी आणि माणसे यांच्यासोबत या जंगली झाडांच्या बिया प्रवास करत असतात आणि नव्या सृजनाची बीजे पंचक्रोशीतील वनराईचा अधिवास जागृत ठेवतात. कपड्यांना चिकटलेल्या सगळ्या काटेरी बिया तर मी झटकल्या.. पण गाडी घेऊन देवगडच्या दिशेने निघालो तेव्हा कोळोशीने उभे केले प्रश्न आणि कुतूहल मात्र झटकता आले नाही.. ते प्रश्न मनात रेंगाळत राहिलेच. येथे राहणारे लोक कोण होते? ते वर्षभर येथे राहत होते की विशिष्ट ऋतूंमध्ये? त्यांनी कोणत्या प्राण्यांची शिकार केली? या परिसरातील जलस्रोतांचा वापर कसा केला? गुहेचा वापर निवाऱ्यासाठी झाला की कार्यशाळेसारखा? या सर्व प्रश्नांची निश्चित उत्तरे अद्याप उपलब्ध नाहीत. म्हणूनच कोळोशीचे महत्त्व केवळ गुहेचा शोध लागण्यापर्यंत मर्यादित नाही, तर पुढील संशोधनाला दिशा देण्यात आहे. याच ठिकाणी कोळोशीचे शैक्षणिक महत्त्व अधिक स्पष्ट होते. इतिहास, पुरातत्त्व, भूगर्भशास्त्र, भूगोल आणि पर्यावरणशास्त्र या पाच वेगवेगळ्या शाखा येथे एकत्र येतात. गुहेपर्यंतचा उतार हा भूरचनांचा अभ्यास घडवतो. गुहेतील खडक भूगर्भीय प्रक्रियांची माहिती देतात. मातीचे स्तर काळाच्या नोंदी जपतात. उत्खनन पुरातत्त्वशास्त्राची पद्धत समजावते आणि दगडी अवजारे मानवी तांत्रिक उत्क्रांतीचे दर्शन घडवतात. त्यामुळे कोळोशी हे केवळ पुरातत्त्वीय स्थळ नसून मुक्त वर्गखोली (open classroom) म्हणूनही महत्त्वाचे ठरते. अशा ठिकाणी आणि कातळशिल्प परिसंस्थेत जर आपण डोळस पर्यटन रुजवू शकलो तर कोणी सांगावे उद्याचे जागतिक दर्जाचे पुरातत्व शास्त्रज्ञ घडवण्यातही कोळोशी योगदान देऊ शकेल.

लेखातील तांत्रिक माहिती आणि अवजारांचे फोटो – ऋत्विज आपटे, गुहेचे फोटो – चिन्मय अनिरुद्ध भावे

Leave a Reply