
जेव्हा पहिल्यांदा मी हे मंदिर पाहिले तेव्हा अजिबात वाटलं नाही की हे पुरातन मंदिर असेल म्हणून. पण मंदिरासमोर असलेल्या पुष्करिणीने लक्ष वेधून घेतले. काळ्या दगडी बांधकामातील हा जलाशय निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की मंदिराचा सभामंडप जरी नवीन कॉंक्रिटमध्ये बांधलेला असला तरीही मंदिरे जुने आहे. आत गेल्यानंतर लक्ष वेधून घेतलं तिथं असलेल्या कृष्ण चरित्रातील कोरीव देखाव्यांनी. महादेवाच्या देवळात विष्णूचे चरित्रपर कोरीवकाम म्हणजे विशेषच.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर अतिशय सुंदर दगडी कोरीवकाम आहे. त्यामधील शिल्पे आणि विशेषतः दोन्ही बाजूला कोरलेले पिसारा फुलवलेले मोर या मंदिराचं खास सौंदर्यस्थान आहे असं म्हणता येईल.
केशव महाजन नामक व्यक्तीने हे मंदिर १७६३ साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या निधीतून बांधल्याचे आंग्रेकालीन अष्टागर या ग्रंथातून समजते. १७९० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचंही कुलाबा जिल्हा गॅझेट १८८३ आवृतीतून लक्षात येते. मंदिरातील नंदी आकाराने मोठा आणि दगडात घडवलेला असून श्रीगणेश आणि भैरवाची शिल्पेही येथे पाहता येतात.
या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं शंकराच्या पिंडीमागे पार्वतीचीही मूर्ती आहे. जीर्णोद्धार करत असताना अनेकदा मूळ रंग आणि सौंदर्याचा विचार न केल्याने पुरातन देवालये आपले पुरातनपण हळूहळू हरवून बसतात. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
या ब्लॉगमध्ये आम्ही कोकणातील विविध मंदिरांचे चित्रण करत आहोत. रत्नागिरी जवळच्या सोमेश्वर मंदिराची माहिती इथं घ्या. दर्या फिरस्ती प्रकल्पात कोकणातील अशाच विलक्षण ठिकाणांची चित्रभ्रमंती आणि डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आमच्या ब्लॉग ला भेट देत रहा, तुमच्या मित्रांना, कोकणवेड्या दोस्तांना जरूर सांगा. फेसबुक, व्हाट्सअप सारख्या माध्यमातून हा ब्लॉग जगभर पोहोचवायला आम्हाला मदत करा ही अगत्याची विनंती.