Darya Firasti

वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यात

रत्नागिरी जिल्ह्यातील एक -प्रमुख नदी म्हणजे वाशिष्ठी. तिवरे येथे अडीच हजार फूट उंच पर्वतराजीतून या नदीचा उगम होतो. एकूण ७४ किमी प्रवास करून वाशिष्ठी नदी अंजनवेल जवळ सिंधुसागराला जाऊन मिळते. नदीचे पाणलोट क्षेत्र २२३८ वर्ग किलोमीटर आहे तर सरासरी जलसंपदा ६ हजार दशलक्ष घन मीटर आहे. शिवाय या नदीत कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी सोडले जाते.

चिपळूण, खेड, दापोली आणि गुहागर या तालुक्यांमध्ये वाशिष्ठीचे पाणलोट क्षेत्र आहे. चिपळूण येथे नदीचे दोन भाग होतात आणि पुढं कालूष्टे येथे ते एकत्र येतात. जगबुडी(६७किमी), वैतरणी(३१किमी), तांबी, नारंगी नाला, डूप(२६किमी), धावती, कामाळ नाला, पिंपळी(२४किमी) अशा उपनद्या वाशिष्ठीत येऊन मिळतात. चिपळूण हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते. गोवळकोट किल्ल्याजवळ नदीच्या बॅकवॉटर्सचे दर्शन छान होते. मालदोली सारख्या ठिकाणी आता नदीतील मगरी पाहण्यासाठी बोट सफारीही सुरु झाल्या आहेत.

जगबुडी ही वाशिष्ठीची महत्वाची उपनदी आहे. गंमत म्हणजे हल्लीच एका भयपटाने प्रसिद्ध केलेलं तुंबाड गाव जगबुडी नदीच्या काठी आहे. हातलोट घाटाजवळ जगबुडीचा उगम आहे. खेडजवळ जगबुडी जवळपास ९० अंशात वळते जे कोकणातील भूगर्भीय वैशिष्ट्याबद्दल आपल्याला काही सांगते. चिपळूणजवळ असलेल्या दिवा गावापर्यंत मोठ्या नावा भरतीच्या वेळी येऊ शकतात आणि पुढे वाहतूक लहान होड्यांतून होते असे सरिताकोश सांगतो.

एक छोटीशी उपनदी वाशिष्ठीला दापोली तालुक्यातून येऊन मिळते. तिचं नाव मला सरिताकोश आणि महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाच्या साईटवर मिळाले नाही पण ती भोपण नावाच्या छोट्याशा गावाजवळ वाशिष्ठीत विलीन होते. या नदीचे नाव कोडजाई नदी. पन्हाळेकाजी लेण्यांच्या परिसरातून ही नदी येते.

नदीच्या मुखाच्या उत्तरेला दाभोळ बंदर आहे तर दक्षिणेला अंजनवेल. या ठिकाणी नदीच्या पात्राची खोली जवळजवळ १२ मीटर आहे. पण इथं अनेक वाळूचे दांडे असल्याने मोठी जहाजे सहज वाहतूक करू शकत नाहीत. दाभोळ बंदरात एका मशिदीचा घुमट दिसतो. या मशिदीचे नाव मांसाहेब मशीद असे आहे. त्याबद्दल या दुव्यावर वाचा.

दाभोळ शेकडो वर्षांपासून कोकणातील एक महत्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर आहे. या ठिकाणचे महत्त्व छत्रपती शिवरायांना ठाऊक असल्याने त्यांनी इथं मोहीम काढून आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. दाभोळ येथे किनारपट्टी अगदी चिंचोळी असून लगेच डोंगराळ प्रदेश आहे. अंजनवेल आणि वेलदूर हा दक्षिण तीरावरचा प्रदेश. तिथं अगदी निवांत वातावरण असते.

अंजनवेल हून गुहागरला जात असताना एनरॉन प्रकल्पाचे मनोरे दिसायला लागतात. त्यापूर्वी नदीच्या मुखाशी असलेला गोपाळगड किल्ला आवर्जून पाहायला हवा. मराठा आरमाराच्या इतिहासाचा विचार करता हे ठिकाण महत्वाचे ठरते. जवळच पश्चिमेला सड्यावर अंजनवेलचे दीपगृह आणि टाळकेश्वराचे शिवमंदिर सुद्धा आहे. प्राचीन काळी नदीच्या पात्रांचा उपयोग व्यापारी वाहतूक करण्यासाठी होत असे. वसिष्ठी नदीतून पूर्वेला चिपळूण पर्यंत जहाजे जाऊ शकत असत. या दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोपाळगडाचा उपयोग होत असे.

टाळकेश्वर मंदिरा शेजारीच अंजनवेलचे दीपगृह आहे. तिथून सभोवताली सुंदर देखावा दिसतो. जवळच डॉल्फिन पॉईंट नावाचा कडा आहे. तिथं रुंद पायवाटेने जाऊन उंच कडे आणि फेसाळता समुद्र मनसोक्त पाहावा! या अनुभवाचे वर्णन दर्याफिरस्तीत पुन्हा कधीतरी! 

इथं बसून सूर्यास्त पाहणे ही एक खास पर्वणीच असते. निळ्याशार सागरावर दिवस मावळतीला येतो तेव्हा सूर्यबिंबाचे तेज सौम्य होत जाते आणि तांबड्या नारिंगी रंगाची तबकडी क्षितीजावर अस्ताला जाते. आपला इतिहासातील प्रवास संपवून आपण गुहागर किंवा दाभोळच्या दिशेने निघतो.

संदर्भ –
१) सरिता कोश – डायमंड प्रकाशन
२) डॉ. सूरज पंडित
३) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र सरकार

6 comments

  1. Anand G Mayekar

    खूप सुंदर, निसर्गरम्य, भौगोलिक, व्यापर- उदिम, भू- रचना विश्लेषण करून दिलेला हा लेख पर्यटक किंवा सामान्य जनांसाठी एक सर्वांग सुंदर सचित्र माहीती पट आहे.
    उदंड शुभेच्छा.
    ॥ शुभम भवतु ॥
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    धन्यवाद

  2. Jeevan

    श्री ना पेंडसे यांच्या तुंबाडचे खोत मध्ये बरेच उल्लेख वरील वर्णनांनी मिळते जुळते आहेत. खूप छान माहिती.

Leave a Reply to Anand G Mayekar Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: