
छत्रपती शिवराय आणि कोकण किनाऱ्याचे नाते अगदी अतूट. मावळखोऱ्यातील रांगड्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भक्ती केली, तर कोकणातील साध्याभोळ्या लोकांनी त्यांच्यावर विलक्षण प्रेम केले. कोकणचे भौगोलिक, व्यापारी, सामरिक महत्त्व शिवरायांनी ओळखले होते. ब्रिटिश, डच, पोर्तुगीज, सिद्दी अशा परकीय सत्ता इथं स्थानिकांवर शिरजोर झाल्या आहेत हे त्यांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रबळ आरमारी शक्ती उभी करणे ही त्यांची प्राथमिकता होती. जसं त्यांनी कल्याण-भिवंडी जवळ खाडीत आरमार बांधून घेतलं, तसंच त्यांनी पाच जलदुर्ग बांधून घेतले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा आणि खांदेरी. या पंचरत्नांपैकी एक किल्ले सुवर्णदुर्ग आपण आज पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे खंबीरपणे सुरु ठेवणाऱ्या अलौकिक सामर्थ्य आणि साक्षेपी दृष्टी असलेल्या एका लढवय्याच्या कारकीर्दीचा उदय सुवर्णदुर्ग किल्ल्यातूनच झाला असे म्हणता येईल त्याचीही गोष्ट आपण जाणून घेऊ. तर किल्ल्यावर पोहोचण्यासाठी हर्णे बंदरात येऊन कनकदुर्गाजवळ असलेल्या धक्क्यावर मी बोटीची वाट पाहतोय. बंदरात कोळी बांधवांची लगबग सुरु आहे. सकाळचा सोनसळी प्रकाश आसमंत उजळून टाकतोय.

सकाळी आठ वाजता बोट वाले मामा आले आणि त्यांनी सांगितले की किमान ८-१० प्रवासी जमा झाले की निघू. साधारणपणे इथं पर्यटक हर्णे बंदरात मासे खरेदी करायला सकाळी लवकर येतात आणि मग निवांतपणे १०-११ वाजता ते मासे हॉटेलच्या खानसाम्याकडे देऊन किल्ल्याच्या दिशेने येतात. पण फोटोग्राफी करण्यासाठी पूर्वाभिमुख किल्ल्याकडे सकाळी लवकर जाणे उत्तम त्यामुळे हजार रुपयांच्या बोलीवर मी एकटाच खासगी बोट करून निघालो.

कनकदुर्गाला वळसा घालून एका छोट्या खडकाळ टापूला बगल देऊन बोट वायव्येला सुवर्णदुर्गाकडे निघते. उजवीकडे आपल्याला कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा किल्ल्याची तटबंदी दिसत राहते. गोवा किल्ल्यावरून थेट अंतर मोजले तर ते साधारण अर्धा किलोमीटर भरते परंतु बोटीने हा प्रवास १.५ किलोमीटर लांब आणि अंदाजे २० मिनिटांचा होतो. समुद्राचे पाणी तसे शांत असल्याने आमची बोट अलगद पुढं जात होती. आता पश्चिमेला सुवर्णदुर्गाची तटबंदी स्पष्ट दिसू लागली.

या बलदंड जलदुर्गाला १५ बुरुज आणि दोन दरवाजे आहेत. तटाच्या भिंतींची उंची सुमारे ३० फूट आहे. संपूर्ण गडफेरी करायची म्हंटली तर एक किलोमीटर पेक्षा काही अधिक अंतर चालावे लागते. किल्ल्याचे क्षेत्रफळ अंदाजे ४ हेक्टर किंवा १० एकर आहे. किल्ल्याच्या पूर्व दिशेला महादरवाजा आहे पण तो सहज दिसत नाही. शिवकालीन दुर्गबांधणीचे हे वैशिष्ट्य मानले जाते. आपली बोट दुर्गाच्या उत्तर पूर्व दिशेला असलेल्या वाळूच्या पुळणीवर जाऊन थांबते आणि किल्ल्याच्या मुख्य तटबंदीच्या बाहेर अधिक संरक्षण म्हणून बांधलेल्या पडकोटाचे अवशेष आपले स्वागत करतात.

या पुळणीवरून काही अंतर चालून गेले की भक्कम महादरवाजाच्या जवळ जाऊन आपण पोहोचतो. या दारावर मारुतीची मूर्ती आहे आणि कासवाची प्रतिमा कोरलेली दिसते. कासव ज्याप्रमाणे संकटाच्या क्षणी स्वतःला कवचात ओढून चिवटपणे झुंज देते तसाच चिवटपणा इथं एका तरुण योद्ध्याने दाखवला. १६९८च्या सुमारास इथं किल्लेदार अचलोजी मोहितेंच्या हाताखाली हा तरुण काम करत होता. शहाजी राजेंच्या काळापासून नावारूपाला आलेले तुकोजी संकपाळ यांचा हा मुलगा.

सुवर्णदुर्ग ताब्यात घेण्याचा प्रयत्न मराठ्यांचा शत्रू सिद्दी करत होता. अचलोजी मोहिते त्याला फितूर होऊन किल्ला ताब्यात देणार हे ओळखून या तरुणाने बंड केले आणि किल्लेदाराला कैदेत टाकले. किल्ल्यावर असलेल्या हनुमंताच्या आशीर्वादाने तो सिद्दी विरुद्ध लढायला सज्ज झाला.

त्याने आवेशाने सिद्दीवर हल्ला चढवला पण तो कैद झाला. पण स्वतःची शिताफीने सुटका करून परत आलेला या तरुणाने आता कासवाप्रमाणे चिवट लढा द्यायचे ठरवले आणि सिद्दीचा वेढा उठवला. झालेली हकीकत छत्रपती राजाराम महाराजांना सांगून त्यांच्या चरणी त्याने स्वतःला अर्पण केले. या माहितीची पडताळणी करून छत्रपतींनी त्या तरुणाला वस्त्रे, सुवर्णदुर्गाची मुख्त्यारी आणि सरखेल ‘किताब दिला. आंगरवाडी च्या संकपाळ घराण्यातील हा कर्तबगार पुरुष म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. (संदर्भ – मराठा आरमार एक अनोखे पर्व – डॉ सचिन पेंडसे. पृष्ठ क्रमांक ६९ प्रकाशक- मर्विन टेक्नॉलॉजीस आवृत्ती २०१७) इतिहासातील या महान लोकांना वंदन करून किल्ल्यात प्रवेश करायचा. महादरवाजा पार केला की आपल्याला इथं पहारेकरी सैनिकांसाठी बांधलेल्या देवड्या दिसतात.

गोमुख बांधणीच्या दरवाजाची रचना ही शत्रूला दरवाजावर थेट धडक देऊन तो फोडून आत शिरणे कठीण व्हावे यासाठी असते. दरवाजाला जाऊन भिडलेल्या सैनिकांना दोन्ही बाजूंनी बुरुजावरून खाली मारा करणाऱ्या सैनिकांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागते. आक्रमक सैन्याविरुद्ध अतिशय चिवट बचाव करणे शक्य व्हावे म्हणून दुर्गरचनेतील अशी वैशिष्ट्ये फार महत्त्वाची ठरतात.

किल्ल्यात शिरल्यानंतर डावीकडे तटावर चढायचे आणि गडफेरी सुरु करायची. मी गेलो तो नोव्हेंबर महिना असल्याने किल्ल्यात बरंच गवत माजलेलं होतं. आणि गंमत म्हणजे हजारो कावळे तिथं प्रचंड कोलाहल करत उडत होते. तटावरून चालताना एखाद्या झाडाजवळ गेलं की बहुतेक तिथं घरटी असल्याने ते कोलाहल माजवत आणि माझ्या डोक्यावर घिरट्या घालू लागत. थोडं पुढे गेल्यानंतर उजवीकडे किल्ल्यातील जुन्या बांधकामांची जोती आणि जुने टाके दिसते.

किल्ल्याच्या पश्चिम दिशेला तटबंदीला लागून खोल खड्ड्यासारखा भाग आहे. तिथं गेल्यानंतर काही फूट खाली उतरून तटबंदीत एक दार केलेलं दिसतं. महादरवाजाच्या विरुद्ध दिशेला असलेलं हे दार एका छोट्याशा भुयाराकडं घेऊन जातं. या भुयारातून समुद्राच्या दिशेने काही पायऱ्या उतरत जाताना दिसतात.

या पायऱ्यांनी खाली उतरून गेल्यावर तटबंदीतून खाली समुद्राकडे उघडलेले दार दिसते. इथं पूर्वी खाली उतरण्यासाठी पायऱ्या असाव्यात. जमिनीपासून साधारण १० फूट उंचावर हा चोर दरवाजा आहे. समुद्रातील कातळाच्या पायाला तासून बांधलेली भक्कम तटबंदी इथून अजूनच राकट भासते.

चढून परत वर तटबंदीवर चढलं की तोफांनी मारा करण्यासाठी केलेली बुरुजांची रचना दिसते. अशा अनेक बुरुजांची मालिकाच या किल्ल्याचं रक्षण करते. किल्ल्यावर आरमारी हल्ला झालाच तर या तोफा आक्रमक जहाजांवर आगीचा वर्षाव करण्यासाठी सुसज्ज असत.

कान्होजी आंग्रे सरखेल झाल्यानंतर कुलाबा हे त्यांचे मुख्य ठाणे झाले तर विजयदुर्ग म्हणजे घेरिया आणि सुवर्णदुर्ग ही आंग्रेंच्या आरमाराची दुय्यम ठाणी झाली. १६६० च्या आधी हा किल्ला आदिलशाहीत होता. तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला व आज आपल्याला दिसतो तो विस्तृत दुर्ग बांधून घेतला. कान्होजी आंग्रेंच्या कर्तृत्ववान कारकीर्दीनंतर हा किल्ला तुळाजी आंग्रेंच्या ताब्यात होता. एप्रिल १७५५ मध्ये पेशवे-इंग्लिश संयुक्त मोहिमेत तुळाजी आंग्रेंचा पराभव झाला आणि किल्ला पेशव्यांकडे आला. दुसरा बाजीराव पेशवा यशवंतराव होळकराच्या आक्रमणाला घाबरून काही काळ सुवर्णदुर्ग किल्ल्यात होता असे दिसते. नंतर पेशवाईचा अस्त झाला तेव्हा कॅप्टन विल्यम्सच्या सैन्याने अल्प प्रतिकार मोडून काढत किल्ला १८१८ मध्ये इंग्लिशांना जिंकून दिला.

किल्ल्यात बोरी बाभळीची झाडे माजलेली असून किल्ल्याच्या उत्तर भागात कोठार सदृश इमारतीचे अवशेष दिसतात. तिथं एक वटवाघळांनी भरलेलं झाडही आहे. जुनी टाकी आणि तलाव पाहून लक्षात येतं की इथं पूर्वी गोड्या पाण्याची मुबलक सोय असावी. आज मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने आपल्याला स्वतः पाणी घेऊन जावं लागतं.

पश्चिम दिशेला पाहताना सागराचे अथांग रूप आपल्याला अंतर्मुख करते एवढं नक्की. मला माझे बोटवाले काका किल्ल्याला प्रदक्षिणा घालताना दिसले! कधीतरी इथं बोटीतून फेरी मारायला हवी.

या किल्ल्याचं राकट रांगडं बांधकाम पाहत राहावंसं वाटतं. जाणवतं की या वास्तूने मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी आणि काळेकुट्ट असे दोन्ही प्रकारचे क्षण अनुभवले आहेत. आणि शेवटी तो इंग्लिशांच्या ताब्यात गेला. आज भारताच्या आरमारी इतिहासाचा मानबिंदू असलेला हा दुर्ग काहीसे दुर्लक्षित आयुष्य जगतो आहे. तिकडं दूर इंग्लंड देशात मात्र त्याची आठवण म्हणून एक किल्ला बांधला गेला आहे.
हा किल्ला जिंकण्यात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या कोमोडोर जेम्सच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने १७८३ साली आपल्या पतीच्या स्मरणार्थ सेव्हर्नद्रूग कॅस्टल नावाचा किल्ला ऑक्सल्स वूड शूटर्स हिल येथे लंडनजवळ उभारला. सुवर्णदुर्ग पाहून परत निघताना मला थोडी खिन्नता वाटत होती. इतका सुंदर किल्ला. दापोली सारख्या ठिकाणापासून जवळ असूनही क्वचितच पर्यटक इथं येतात. इतिहासाशी समरस होण्याची संधी घेतात. इथं जबाबदार, डोळस, पर्यावरणपूरक पर्यटन वाढावं यासाठी खूप काही करता येईल. त्यासाठीच दर्या फिरस्ती प्रकल्प सुरु केला आहे. मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील हे महत्त्वाचं रत्न अज्ञातवासात राहणार नाही अशी आशा करूया.
wish there was just a little bit of English, fort name. Which is Janjira?
This is fort suvarnadurga. I agree we need these blogs in English too. Trying to get in resources to start that soon
शिवरायांनी जे पंचरत्न किल्ले बांधले या मध्ये विजयदुर्ग हा किल्ला येत नाही, हा किल्ला अगोदर पासून उपस्थित होता. पाचवा किल्ला पद्मदुर्ग हा आहे.