
चौल रेवदंडा परिसरात भ्रमंती म्हणजे ऐतिहासिक वास्तू अभ्यासणाऱ्या लोकांसाठी पर्वणीच. रेवदंड्याचा पोर्तुगीज कोट आणि त्यातील अवशेष, कोर्लई चा डोंगरी दुर्ग, बेने इस्राएल समाजाची सिनेगॉग आणि दफनस्थळे, कलावंतिणीचा महाल, अनेक मंदिरे अशा कितीतरी वास्तू पाहण्याची संधी इथं मिळते. काळाच्या पडद्याआड गेलेली आणि नारळ सुपारीच्या वनात गायब झालेली अशीच एक वास्तू म्हणजे चौलचा राजकोट किल्ला. पर्यटनाच्या नकाशावर सहजपणे न सापडणाऱ्या या दुर्गाची आज आपण माहिती घेणार आहोत.

बोकारो नावाच्या इतिहासकाराच्या नोंदीनुसार हा किल्ला १६३६-४६ या विजापूर सत्तेच्या काळात इथं बांधला गेला. ६० पावलं लांबीची तटबंदी असलेल्या या दुर्गाला चार बाजूला १४ फूट उंचीचे बुरुज होते. दोन मजली वाड्याचे अवशेष आणि आठ बाजू असलेले खांब इथं होते. १६८४ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांनी रेवदंडा कोर्लई परिसरात पोर्तुगीजांविरोधात मोहीम उघडलेली असताना१६८३ मध्ये हे संरक्षक बांधकाम केले असं शां वि आवळस्कर सांगतात.

या दुर्गाशी निगडित एक ठळक युद्धप्रसंग म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रेनी पोर्तुगीजांना शिकवलेला धडा. त्यांनी ब्राम्हणगाव नावाचे ठिकाण वसवले (बहुतेक सागरगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे) त्यावर पोर्तुगीजांनी आणि काही मांडलिक भंडारी सैनिकांनी हल्ला केला. कान्होजी आंग्रेंना या हल्ल्याची बातमी हेरांनी आधीच दिली होती. त्यांच्या प्रतिहल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुण पराभव झाला आणि आंग्रेनी आक्रमकांचा वेगाने पाठलाग करत कत्तल सुरु केली. हा हल्ला इतका तिखट होता की पोर्तुगीजांना आपला रेवदंडा कोटही गाठता येईना. तेव्हा चौलच्या हकीम मोतमखानाने त्यांना राजकोटात आश्रय दिला. १७३३-३४ च्या आसपास छत्रपती शाहू महाराज आणि मुघलांच्या दरम्यान झालेल्या. कराराप्रमाणे राजकोट मुघलांना दिला गेला आणि त्यांच्या वतीने संभाजी आंगरे कारभार पाहू लागले. पुढे या कोटाच्या आडून शत्रूचा उपद्रव होऊ नये म्हणून मराठ्यांचे सरदार बाजीराव बेलोसे यांनी १७४८ मध्ये सुरुंग लावून राजकोट जमीनदोस्त केला. स्थानिकांना विचारत विचारत विविध खुणा तपासत या किल्ल्याच्या काही भिंतींचे अवशेष मला पाहता आले. ते मी जीपीएस ने टिपले आहेत. 18.552973, 72.943235 या ठिकाणी जाऊन तुम्ही राजकोटाचे अवशेष पाहू शकता. पण या भिंती खासगी वाडीत आहेत त्यामुळे स्थानिकांची आदरपूर्वक परवानगी घेऊनच पुढे जा. कोकण किनाऱ्यावरील अपरिचित स्थळांचे दर्शन घेत आपण अपरान्त भूमीचा इतिहास जाणून घेत राहणार आहोत. अशाच अनेक ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत रहा.