5 जून 2026, जागतिक पर्यावरण दिवस. दिवसाची सुरुवात गोपाळगड किल्ल्याचा पडकोट पाहून झाली. त्यानंतर श्री टाळकेश्वराचे दर्शन घेऊन डॉल्फिन कड्याची भटकंती झाली. गुहागर बागच्या लांबलचक पुळणीवर चालून झाले.. भरतीच्या वेळेला पालशेत बंदर पाहून मग पालशेतच्या दत्ताचे दर्शनही घेतले. अडूर जवळ नागझरी येथे नृसिंह लक्ष्मी मंदिर शोधले.. बोऱ्या बंदर, कोंड कारूळ मार्गे वेळणेश्वर रोहिले तवसाळ मार्गाने फेरी पकडली आणि जयगड मध्ये मुक्काम करायचा म्हणून हॉटेल गाठले. Driftwood Inn नामक ठिकाणी मला मुक्काम करायचा होता. बुकिंग केले नव्हते आणि वीकेंड आलेला असल्याने हॉटेल मध्ये एकही रूम शिल्लक नव्हती. जयगड मध्ये इतरही ठिकाणी हीच परिस्थिती होती. त्यामुळे गाडी गणपतीपुळे येथील वेस्ट बे मध्ये चार्ज करायची आणि मग ओनेस्ट मध्ये मुक्काम करायचा असे ठरवून पुढे निघालो. दिवस मावळतीला आला होता. प्रचंड भूकही लागली होती. कधी एकदा गरम पाण्याने अंघोळ करून झोपतो असे झाले होते.. सुमारे 17-18 किमी अंतर पाऊण तासात पार करायचे होते. आता कोणतेही नवीन ठिकाण पाहण्याचा उत्साह उरलेला नव्हता. जेमतेम 3-4 किमी अंतर गेलो असेन तेव्हा उजवीकडे एक विलक्षण दृश्य दिसले.

जवळपास निर्मनुष्य समुद्र किनारा. ढगांनी व्यापलेले क्षितिज आणि सूर्यबिंब दिसत नसले तरीही ढगांच्या मागून होणारी लाल, नारिंगी, पिवळ्या रंगांची चित्रकारी. क्षितिजाआड जाण्यापूर्वी सूर्याने ढगांच्या फटीतून सोनेरी प्रकाशाची अखेरची उधळण केली होती. त्या झळाळीने काळसर ढगांना सोनेरी किनार लाभली होती, तर समुद्र आणि ओलसर वाळूनेही त्या रंगांची निःशब्द साक्ष ठेवली होती. किनाऱ्यावरील शांतता, लाटांची संथ लय आणि क्षणोक्षणी बदलणारे आकाश यामुळे हा सूर्यास्त डोळ्यांनी पाहण्यापेक्षा मनात साठवून ठेवण्यासारखा वाटला. मला ललित लेखनाची खूप आवड आहे असे नाही.. मी जास्त वैचारिक, ऐतिहासिक पुस्तकांमध्ये रमणारा वाचक आहे..परंतु निसर्गचित्रे आणि अनुभवांचे शब्दांकन करणाऱ्या कविता मला खूप आवडतात. त्या क्षणी मला बाकीबाब बोरकरांची समुद्रराग ही कविता आठवली –
पावसात जागला समुद्रराग सावळा
लाट लाट दाटते भरुन भाव कोवळा
काठ काठ ढासळे, पिसाट माड स्फुंदती
आंधळ्या ढगांतूनी प्रकाशबिंदू सांडती
उंडी किनारा केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नव्हे, तर त्याच्या भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांसाठीही महत्त्वाचा आहे. या किनाऱ्याच्या वाळूमध्ये इल्मेनाईटसारख्या जड खनिजांचे नैसर्गिक साठे आढळतात.. यातून टायटॅनियम सारखे धातू मिळू शकतात… भरती-ओहोटीच्या सततच्या प्रक्रियेमुळे समुद्र या जड खनिजांना विशिष्ट पट्ट्यांमध्ये साचवतो. त्यामुळे उंडीचा किनारा हा इतिहास, निसर्ग आणि भूविज्ञान यांचा एकत्रित अनुभव देणारा कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनारा ठरतो. इथूनच पुढे मालगुंड येथील केशवसुत स्मारकही पाहण्याजोगे आहे.. ती गोष्ट पुन्हा कधीतरी.